शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०१०

पालीच्या गणपतीची आरती!

पाषाणभेदने रचलेली ही पालीच्या बल्लाळेश्वराची आरती त्याच्या विनंतीवरून मी गायलेली आहे....पारंपारिक चाल असल्यामुळे माझे असे ह्यात काहीही योगदान नाहीये.

जयदेव जयदेव जय पालीश्वरा हो, देवा बल्लाळा
आरती ओवाळीतो  तुजला बल्लाळा
जयदेव जयदेव || ध्रु ||

देऊळ मोठे तुझे चौसोपी दगडी
असे आत मुर्ती शेंदरी उघडी
समोर घंटा भव्य खांब लाकडी
वर्णावया  रुप, बुद्धी तोकडी || १ ||


देवा तुझा निवास 'पाली’च्या गावी
तुझ्या दर्शनाने  दृष्टी सुखावी
मोदकांचा नैवेद्य मी तुजला दावी
कृपा भक्तांवर नियमीत असावी || २ ||


पौराणीक, ऐतिहासीक तव ग्राम असे
मंदिर सुंदर मागे सरसगड वसे
वर्णन म्या पामर करू तव कैसे
सच्चा एक मुढ वंदन करीतसे || ३ ||


कवी: पाषाणभेद(दगडफोड्या)

आरती इथे ऐका

गुरुवार, ३० डिसेंबर, २०१०

सोबत: माझी चाल-शंभरी!

ही माझी शंभरावी चाल आहे.
क्रान्तिच्या ह्या गजलेला लावलेली चाल कशी वाटली ते ऐकून सांगा...मला कल्पना आहे की,ही चाल गजलेसारखी नाहीये...पण ह्या गजलेचा एकूण आशय लक्षात घेता मला ती चाल भैरवीच्या अंगाने आणि तीही संथगतीने असावी असे वाटले,म्हणून मी मुद्दाम ती तशी बनवलेय.



मी पुसट पुसट शब्दांचे अन्वयार्थ शोधत होते,
हातावरच्या मिटलेल्या रेषांना जोडत होते

केव्हाच संपली होती पुनवेची अल्लड गाणी,
अवसेचे दार बिचार्‍या चंद्राला रोखत होते

टाकून देववत नव्हते निर्माल्य ओंजळीमधले,
ताज्या स्वप्नांची परडी हातातुन सोडत होते

आजन्म चालला माझा हा खेळ विचित्रपणाचा,
तुटलेले जोडत होते, जुळले की तोडत होते!

"ती हरली आहे, आता शेवटचा घाला घालू"
ते दैव पाशवी माझे कोणाशी बोलत होते?

मायेच्या पाशामधली एकेक वीण सोडवली,
विरल्या आशेचे थडगे जाताना सोबत होते!

कवयित्री: क्रान्ति साडेकर
चाल इथे ऐका.

बुधवार, २९ डिसेंबर, २०१०

पाऊस!

मन!

राघवची कविता वाचताक्षणीच आवडली आणि सहजपणाने चाल उलगडत गेली. सोईसाठी काही निवडक ओळीच घेतलेत.
ही आहे चाल क्रमांक ९८

मन उगाच धावतं..कशापाठी वेडावतं!
जसं लहानगं मूल प्रतिबिंबास धरतं..

मन उगाच उदास..सदा रुसल्याचा भास!
जशी कोकीळाची साद अन्‌ नुसताच त्रास!!

मन उगाच निस्तब्ध..काळजाचा थरकाप..
जसा स्तब्ध पाण्यावर, उठे तरंग..अश्राप!

मन उगाच तत्वज्ञ, करी अनंत विचार..
जशी अळवाच्या पानी मोतियाची थरथर!

मन उगाच अल्लड..दोन अश्रुंची झिम्मड!
जशी पावसाची सर..अलगद..अलवार..

मनं जुळून येतात..हातांमधे दोन हात..
जशी रात्र दिवसाची उलगडते पहाट!!

कवी: राघव

चाल इथे ऐका.

शनिवार, २५ डिसेंबर, २०१०

का बंध रेशमाचे !

जयश्रीची ही गजल वाचून मला ही चाल सुचली.सोईसाठी काही निवडक द्विपदी घेतलेत.

का बंध रेशमाचे जुळले कधीच नाही
चित्रात रंग माझ्या भरले कधीच नाही

त्या सावळ्याच होत्या रात्री फिरून माझ्या
देहात चांदणे मग फुलले कधीच नाही

बरसात ही सुरांची तव मैफ़लीत होते
मज त्या सरींत भिजणे जमले कधीच नाही

डोळ्यात जागलेल्या रात्री कितीक माझ्या
स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही

जखमा दिल्या जगाने, बुजल्या तशाच सा-या
का घाव तू दिलेले भरले कधीच नाही

जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते
का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही

कवयित्री: जयश्री अंबासकर

चाल इथे ऐका.

गुरुवार, २३ डिसेंबर, २०१०

ही कुठली दुनिया असली?

आरती गुरुदत्ताची!

पाषाणभेद ह्याने लिहिलेल्या हा गुरुदत्तांच्या आरतीची चाल ऐका.

आर्त विनवणी करू गुरूदत्ताची
ब्रह्मा विष्णू महेशाची
आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ||ध्रू||

ब्रह्मदेव सृष्टी रचितो
श्रीविष्णू पालन करितो
महेश संहार करी, पुनर्निर्मितीसाठी
आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ||१||

शंख चक्र कमंडलू धरीले हाती
खांद्यावरी झोळी, भस्म असे माथी
देवा दत्ता भिक्षा घ्या गरीबाघरची
आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ||२||

जटाजूट घन केशसंभार
रुद्राक्षमाळा गळाभरोनी
गोश्वानासह त्रैमुर्ती अवतरली
आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ||३||

कवी: सचिन बोरसे उर्फ पाषाणभेद (दगडफोड्या)

चाल इथे ऐका

रविवार, १९ डिसेंबर, २०१०

ओढ

उमेश कोठीकरची ही निसर्गरम्य कविता वाचली आणि ही चाल सुचली.


धारित्रीच्या स्वयंवराला, मेघ बरसती असे निरंतर
या मातीतून मोती येतील, हा सृष्टीचा कुठला मंतर?

मेघपंख हे निळे लावूनी, या वार्‍याचे गीत गाऊनी
बरसून जाऊ पंखांसमवे, विहरत आपण असे दिगंतर

आठवणींचे श्वास असू दे, निकट तुझा आभास असू दे
मिटवून टाकू थरथरणार्‍या, श्वासांचे हे उत्कट अंतर

मृदगंधाला अंगी भिनू दे, हिरवे हिरवे हृदय होऊ दे
या हृदयातील प्रेमफुले ही, डोलत ठेवू अशी अधांतर

श्रावणात या चिंब न्हाऊनी, ऋतु सावळा मनी लेवूनी
ओढ रेशमी गर्दगुलाबी, दो हृदयांना जशी समांतर

या मातीची आस असू दे, येऊ परत विश्वास असू दे
कालचक्र हे विसरून जाऊ, मिठी असू दे युगे निरंतर

मनामनाच्या उजळून वाती, सजवू गहिर्‍या श्रावणराती
काय चूक अन काय बरोबर, ठरवू बाकी आपण नंतर!

कवी: उमेश कोठीकर

त्रितालात गायलेली चाल इथे ऐका.

रविवार, १२ डिसेंबर, २०१०

मौनाचं वादळ

जयश्रीच्या ह्या सहज-सोप्या शब्दांना मी अशी चाल लावली....

काहीतरी खुपतंय, सलतंय आत
कुठंतरी खोलवर दुखतंय आज

उगाच गहिवर, आवंढा घशात
कोंडलेला श्वास, सैरभैर मनात
मन कसं पिसं झालंय आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज

पापण्यांची होते झालर ओली
रडवेली होते देहाची बोली
कबुली कशाची द्यावी आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज

सयींचं व्याकुळ, आठव मोहळ
उरात कल्लोळ, मौनाचं वादळ
कोरडा श्रावण, भिजवे आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज

कवयित्री: जयश्री अंबासकर

चाल इथे ऐका.

शुक्रवार, १० डिसेंबर, २०१०

पाऊस!

उमेश कोठीकरच्या ह्या कवितेतला पाऊस पाहून मलाही बरसावंसं वाटलं. ;)
ह्या कवितेला सुचलेली चाल ऐकून सांगा ,कितपत आवडली ते.


भेगाळ या धरेच्या, शिरतो तनात पाऊस

मृदगंध भिनवितो, हसतो फुलांत पाऊस


हिरवाच ढंग सगळा, हिरवी वसुंधरा ही

हिरवेच कोंब येती, हिरव्या दिशांत पाऊस


का आस ही फिटेना, का चिंब मी भिजेना?

ही भूक जागवितो, कसली तनात पाऊस?


हा मोर का विभोर, अतृप्त का चकोर?

हे थेंब आठवांचे, स्त्रवतो मनात पाऊस


भिजवून यौवनाला, कटी चिंब हा अकार

जणू थाप ही मृदंगी, देतो दिलात पाऊस


बरसून रेशमी हा, सुख गार गार देतो

मनशिंपलीत माझ्या, शिरतो क्षणात पाऊस


हे अर्घ्य सागराचे, वरदान हे प्रभुचे

हा साद नित्य देतो, वसतो नसांत पाऊस


कवी: उमेश कोठीकर


चाल इथे ऐका.

चोरटा मुरारी - गौळण

मुटेसाहेबांच्या ह्या गवळणीची चाल कशी वाटतेय?


शिंके हा तोडी, माठ हा फ़ोडी
सांगा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥धृ०॥

शेला पागोटा काठी हातात
अवचित येवुनिया घुसतो घरात
खिडकी हा तोडी, काचा हा फ़ोडी
बांधा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥१॥

यमुनेचा चोरटा, मथुरा मुरारी
पकडाया जाता, होतो फ़रारी
चव हा चाखी, ओठ हा माखी
टांगा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥२॥

व्दारकेचा व्दाड, ऐकेना कुणाशी
अरविंद मागे लोणी, हरी चरणाशी
कमरेशी बांधा, पायाशी टांगा
कोंडा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥३॥

कवी: गंगाधर मुटे

इथे चाल ऐका.


गुरुवार, ९ डिसेंबर, २०१०

सिंदूर !

मिलिंद फणसेंची ही अर्थवाही गजल वाचताच जी चाल स्फुरली ती ही अशी...


नि:शब्द होत गेलो, कणसूर होत गेलो
तेव्हा कुठे जगाला मंजूर होत गेलो

ठिणग्या विझून गेल्या, जमले न पेट घेणे
केवळ जरा धुमसलो अन्‌ धूर होत गेलो

धारा न अमृताच्या वळल्या फिरून मागे
जो ओसरून गेला तो पूर होत गेलो

झाल्यात पोसलेल्या जळवा कशा टपोर्‍या
माझीच चूक आहे, मी ऊर होत गेलो

स्मरणातुनी जगाने पुसले असे मला की
वैधव्यग्रस्त भाळी सिंदूर होत गेलो

कवी: मिलिंद फणसे

चाल इथे ऐका.

अंतराळ !

क्रांतीची अजून एक सुंदर आणि तरल अशी ही कविता वाचली आणि चाल सुचली ती अशी....

अंतराळ हा तुझाच, पंख तुला स्वप्नांचे

चंद्रबिंब प्रतिभेचे, तारांगण शब्दांचे ॥


या विशाल अंबरात उंच उंच विहरत जा,

साद देतसे दुरून आमंत्रण पक्षांचे ॥


वाजते दिशांमधून मंद धून वार्‍याची,

इंद्रधनू गुणगुणते भावगीत रंगांचे ॥


संथ या जलाशयात नाव बुडे किरणांची,

भांडारच जणु लुटले कुणि सुंदर रत्नांचे ॥


पंखांवर नभ तोलुन मानस वाचत फिरते,

बंधमुक्त पाखरू तुझ्या ऋणानुबंधांचे ॥


मनकवड्या पाखरास गुपित मुळी सांगु नको,

अवघ्या काही क्षणांत होइल ते विश्वाचे ॥

कवयित्री: क्रान्ति साडेकर

चाल इथे ऐका.

बुधवार, ८ डिसेंबर, २०१०

तुला ना कळे लोचनांची कहाणी..

राघव उर्फ राहुल पाटणकरची ही आर्त रचना वाचून मला चाल सुचली ती अशी...


जरी व्यक्त होती मनी आर्त गाणी..

तुला ना कळे लोचनांची कहाणी..


नदी-सागराची घडे भेट साधी..

तरी, अंतरी, छेडते सूर आधी!

शब्दांविना बोलते मूकवाणी..

तुला ना कळे लोचनांची कहाणी..


कधी भासती, भास झाले खरे हे!

कधी श्वास माझा उगा अडखळे रे!!

सुखाची दरी, ही अशी जीवघेणी..

तुला ना कळे लोचनांची कहाणी..


नको रे असा दूर जाऊ सख्या तू..

सुगंधाविना मोगरा पोरका तू..

सांगू कसे, का फुले - रातराणी!!

तुला ना कळे लोचनांची कहाणी..

कवी: राघव

चाल इथे ऐका.

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०१०

गगनावरी तिरंगा... !

गंगाधर मुट्यांच्या ह्या भारताच्या तिरंगी ध्वजाबद्दलच्या  काव्यबद्ध भावना वाचून मलाही उचंबळून आले आणि त्यातच ही चाल सुचली...ऐकून सांगा..कशी वाटली ?



अतृप्त!

उमेश कोठीकरची ही स्वप्नाळू कविता वाचली आणि जी चाल सुचली ती ऐका...पाहा आवडतेय का?
(काही निवडक कडवीच घेतलेत चाल लावण्यासाठी)


चंद्र ल्यावा या ललाटी, स्वप्न जे घडलेच नाही
तू सखा बनलाच नाही , मी सखी झालेच नाही

येउनी हलकेच मागे, तू मला बाहूत घ्यावे
मी रूसावे; मी भिजावे, मी असे जगलेच नाही!

रात्रमदीरा ती भिनावी, ही तनू कैफात न्हावी
सूर अपुल्या अंतरीचे, का कधी जुळलेच नाही?

कोरड्या अधरांपरी हा, देह माझा कोरडा का?
प्रणय का उपचार भासे? मी कधी फुललेच नाही

स्वप्न ओथंबून यावे, चिंब हे आयुष्य व्हावे
जे दिवस निसटून गेले, का पुन्हा वळलेच नाही?

रिक्त तू होऊन सखया, का झणी मिटतोस डोळे
गूज नंतरचे सुखावह, रे तुला कळलेच नाही

तू असा अन तू तसा तर, 'मी' कुठे हे शोधिले मी
हृदी तुझ्या गर्दीत मी च्या, 'मी' मला दिसलेच नाही!

कवी:उमेश कोठीकर

गुरुवार, २ डिसेंबर, २०१०

आठवते मग उगाच काही !

सुरुचि नाईकची ही भावविभोर कविता वाचून सुचलेली चाल ऐका.

आठवते मग उगाच काही
ध्यानी मनी ही नसताना
नदी तीरावर भणभण वारा
उगाच हळवा होताना...

स्मरते मग ती ओली माती
बोटांमधून सुटणारी
आणि कुठेशी खिळून राहते
पदराने हळू टिपताना
आठवते मग उगाच काही
ध्यानी मनी ही नसताना

नुरते मग मज भान कशाचे
नदीतीराच्या त्या खडकावर
जिथून पाहिले लहरींमधले
बिंब तुझे विरघळताना
आठवते मग उगाच काही
ध्यानी मनी ही नसताना

कवयित्री: सुरूचि नाईक

चाल इथे ऐका.