मनीषा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मनीषा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १६ एप्रिल, २००९

अनंगरंग !

अनंगरंग ह्या मनीषाच्या एका सुंदर कवितेला मी दोन चाली दिलेत. एक एकदम माझ्या सहजप्रवृत्तीविरुद्ध चाल दिलेय आणि दुसरी नेहमीचीच चाल आहे.. ऐकून सांगा कशा वाटताहेत.


अनंगरंग

धुंद एकांत हा - तुझ्या सवेच रंगतो
प्रणयाचा पूर ही हृदयी या उधाणतो ।

स्पर्श स्पर्श जागवी अनोखीच चेतना
श्वास श्वास धुंद हा तनूवरी विसावतो ।

उष्ण अधर कापती - रंगती कपोलही
मुक्त कुंतलात या जीव तुझा गुंततो ।

झंकारे देहवीणा तुझीया कवेत रे
रासझूला चांदवा - अनंगरंग उसळतो ।

विखूरले उशीवरी चांदणे अजूनही
न्हाऊनी प्रीतीत मन मोगराही उमलतो ।

बरसत्या चांदण्यात तारकांच्या मैफिली
रातराणी बहरे, धुंद चाफा दरवळतो |

कवयित्री: मनीषा
चाल इथे ऐका.
पहिली चाल


दुसरी चाल

रविवार, ५ एप्रिल, २००९

रिता गाभारा .....

मनीषा ही मिसळपाव ह्या संकेतस्थळावर नियमितपणे लेखन/कविता करत असते. "रिता गाभारा ....." ही तिची कविता वाचताक्षणी तिला चाल लावावीशी वाटली असे म्हणण्यापेक्षा ती चाल त्या कवितेतूनच आपोआप साकार होत गेली. मी केवळ निमित्तमात्र उरलो.

रिता गाभारा .....

देहात माझीया हा
चंद्र वितळून गेला ।
अन अंतरी मोगराही
सुगंध मिसळून गेला ।

झुकवुनी लाख पाहिले
नजरेस मी माझीया ।
तीर तुझ्या नजरेचा
काळजास वेधून गेला ।

बेरंगी दुनियेचा ना
कायदा मी मोडला ।
इशाराच एक तुझा
मज हाय रंगवून गेला ।

वेचियेली मी दुःखेही
माझ्या दोहो करांनी।
फासा दुर्दैवाचा मज
दान देऊन गेला ।

ओळखले नसे कधीही
माझ्याच मी जगाला ।
सौख्याचा क्षण मजला
नेहमीच फसवून गेला ।

गर्दीत अनोळख्यांच्या
मज मैत्र एक भेटला ।
जीवलगच तो जीवाचा
मग घाव घालून गेला ।

लाविले कसास माझ्या
मी प्रत्येक श्वासाला ।
क्षणाक्षणांनी काळही
मजला परखून गेला ।

शोधियले त्रिखंडात मी
त्याच सर्वेश्वराला ।
-हुदयीचा गाभारा पण
रिताच राहून गेला ।

कवयित्री: मनीषा
रूपक तालात गायलेली चाल इथे ऐका.