शनिवार, १० सप्टेंबर, २०११

या मनाचं सालं काही, समजत नाही

या मनाचं सालं काही, समजत नाही
जडंल कुणावर काही, उमगत नाही

लाल हिचे गाल कधी
लांब तिचे केस कधी
घारे हिचे डोळे कधी
गोरा तिचा रंग कधी
भावंल कुणाचं काय नेमच नाही
या मनाचं सालं काही समजत नाही

जाईल तिथं घात करील
दिसेल तिला डोळा मारील
ही आली, धड-धड झाली
चाल तिची तुडवून गेली
कुठं, काय, कधी होइल, नेमच नाही
या मनाचं सालं काही समजत नाही

आज पहा हिच्या प्रेमात
उद्या पहा तिच्या नादात
आज म्हणे "ही चांगली"
उद्या म्हणे "तीच बरी"
एकीवर पक्कं कधी बसतंच नाही
या मनाचं सालं काही समजत नाही

कवी: डॉ.अशोक कुलकर्णी
इथे चाल ऐका.

सोमवार, ५ सप्टेंबर, २०११

तुंदिलतनु श्री गणेश!

एकदंत, वक्रतुंड रूप गोड गोजिरे
तुंदिलतनू श्रीगणेश नृत्य करी साजिरे || धृ ||

ताल देतसे समीर, रुणझुणती घाग-या
चंचल चपला उतरे पावलांत नाच-या
सोनसाखळ्या चरणी, त्यांत जडविले हिरे
तुंदिलतनू श्रीगणेश नृत्य करी साजिरे || १ ||

मनमोहक हावभाव, मूक तरी बोलके
माय - तात गौरी-शिव पाहतात कौतुके
गिरकी घेता गणेश, सकल विश्वही फिरे
तुंदिलतनू श्रीगणेश नृत्य करी साजिरे || २ ||

सूर्य-चंद्र, गगन-धरा, गिरि-सागर दंगले
तीन लोक नृत्याच्या मोहिनीत रंगले
दिन-रजनी विसरुनिया काळ नर्तनी विरे
तुंदिलतनू श्रीगणेश नृत्य करी साजिरे || ३ ||

कवयित्री: क्रांति साडेकर
चाल : प्रमोद देव
गायन : श्री केदार पावनगडकर
हार्मोनिअम : श्री केदार पावनगडकर
तबलासाथ : श्री सुहास कबरे

केदार पावनगडकरांसारखा उत्तम गायक, आणि कबरेसाहेबांसारखा प्रख्यात तबलजी लाभला आणि माझ्या चालीचे सोने झाले.
इथे चाल ऐका.