मिलिंद फणसे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मिलिंद फणसे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २ एप्रिल, २०११

कळ्यांना जागवूनी बोलले दव

कळ्यांना जागवूनी बोलले दव
"उरे दो-चार घटकांचेच शैशव"

प्रिये, तोरा गुलाबाचा असावा
नि मोहाच्या फुलांचे धुंद आसव

अता उमलावयाची वेळ झाली
सख्याचे नादती बागेत पदरव

मधाचे बोट आता खूप झाले
उधाणू दे मधाचा मत्त अर्णव

दवाचा स्पर्श अन्‌ चुंबन अलीचे
कळी खुलते नि घडतो संगमोत्सव

धुक्याच्या चादरीने फूल झाकी
जणू उन्मीलितेचे तृप्त सौष्ठव

जराही ना दुखवता फूल खुडणे
असे याहून काही हस्तलाघव ?

किती, 'भृंगा', तुझी, रे, दांडगाई
अशा वेळी हवे रेशीम मार्दव...

कवी: मिलिंद फणसे

मिलिंदरावांची ही गझल वाचून मला स्फुरलेली चाल खाली ऐका. सोईसाठी काही निवडक द्विपदी घेतल्या आहेत.

गुरुवार, ९ डिसेंबर, २०१०

सिंदूर !

मिलिंद फणसेंची ही अर्थवाही गजल वाचताच जी चाल स्फुरली ती ही अशी...


नि:शब्द होत गेलो, कणसूर होत गेलो
तेव्हा कुठे जगाला मंजूर होत गेलो

ठिणग्या विझून गेल्या, जमले न पेट घेणे
केवळ जरा धुमसलो अन्‌ धूर होत गेलो

धारा न अमृताच्या वळल्या फिरून मागे
जो ओसरून गेला तो पूर होत गेलो

झाल्यात पोसलेल्या जळवा कशा टपोर्‍या
माझीच चूक आहे, मी ऊर होत गेलो

स्मरणातुनी जगाने पुसले असे मला की
वैधव्यग्रस्त भाळी सिंदूर होत गेलो

कवी: मिलिंद फणसे

चाल इथे ऐका.

शुक्रवार, १७ एप्रिल, २००९

वारसे.

’वारसे’ ही मिलिंद फणसे ह्यांची अजून एक सशक्त गजल. गजल वाचताच चाल लावाविशी वाटली.

वारसे

गाव हा नाही तुझा, ना तुझी ही माणसे
सोड सारे, जा पुढे, पूस जाताना ठसे

कैकदा हृदयाहुनी भिंत ओली पाहिली
मी मनांचे पाहिले उंबरे बेजारसे

सावली शोधावया वृक्ष वणवणती इथे
अन् स्वतःला पाडण्या बिंब शोधी आरसे

जाहले आशीषही वास्तुपुरुषाचे मुके
सोयर्‍यांचे चेहरे कोरडे; मौनी घसे

वडिलधार्‍या सावल्या दे मला माध्याह्निला
ना तरी दे घन तमी वाट-चुकले कवडसे

पावसाचे आगमन दूर नाही फारसे
चेहर्‍यावर काजळी, नेत्रही गर्भारसे

विहर तू बागेत पण विहर चिलखत घालुनी
भृंग, बाणांचे इथे फूल सांगे वारसे

कवी: मिलिंद फणसे
इथे चाल ऐका.

रविवार, ५ एप्रिल, २००९

विसावा!

मिलिंद फणसे ह्यांची ही अशीच एक वेगळी गजल आहे "विसावा". ह्या गजलेची चाल देखिल तिच्यातच लपलेली होती असे वाटते. ऐकून सांगा, कशी वाटली?

विसावा

घे तुझ्या बाहूत शीतल, त्या जगी पोळून आलो
दे विसावा माय गंगे, राख मी होवून आलो

ही न वसने आवडीची, क्लेशदायक बंद ज्यांचे
रेशमाचे पाश ज्याचे वीण ती उसवून आलो

साथ अंबर, साथ तारे जे अनंताचे इशारे
मर्त्य, चकव्या सोबत्यांची साथ मी सोडून आलो

स्फुंदणाऱ्या लेखणीला सत्य हे सांगू कसे की
कोरडी झालीस तू अन् मी रिता होवून आलो

शब्दही देती दगा का, भृंग, ब्रह्मास्त्राप्रमाणे
शाप कोणा भार्गवाचा का शिरी घेवून आलो ?

कवी: मिलिंद फणसे

चाल ऐका!

शनिवार, ४ एप्रिल, २००९

रोषणाई !

मिलिंद फणसे हे अजून एक महाजालावरचे नामांकित कवी. गजला,कविता-लेखन ते नियमितपणे मनोगत ह्या संकेतस्थळावर करतात. त्यांची "रोषणाई" ही गजल सामाजिक दांभिकतेवर वार करते.गजलेतले दोन शेर मी सोडून दिलेले आहेत कारण ...तेच. माझी तोकडी प्रतिभा. बाकी मुखडा आणि तीन शेरांचा समावेश मी ध्वनीमुद्रणात केलाय