धोंडोपंत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
धोंडोपंत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २५ जुलै, २००९

जाता जाता !...माझी ५०वी चाल!

धोंडोपंतांची ही अजून एक सशक्त गजल. मूळ गजलेतील काही निवडक शेर मी चाल लावण्यासाठी घेतलेत. चाल ऐकून आपले मत जरूर नोंदवा.

मंडळी,सांगावयास आनंद होतोय की ही माझी ५०वी चाल ठरलेय.


जाता जाता

जिथे तिथे मी हर्ष पेरला... जाता जाता
आनंदाचा मळा फुलवला... जाता जाता

समोर तू येताच अचानक मी गडबडलो
एकच ठोका हृदयी चुकला... जाता जाता

दोन शेर लिहिल्यावर होती गझल रखडली
तू दिसल्यावर तिसरा सुचला... जाता जाता

असा काय गंभीर गुन्हा मी केला आहे?
एकच चिमटा तुला काढला... जाता जाता

तुझे इशारे तुझ्या खुणा लाजवाब होत्या
अर्थ मला पण उशिरा कळला... जाता जाता

हासत खेळत भेट आपुली झाली तरिही
कंठ का बरे तुझा दाटला... जाता जाता

खूप प्रयासाने थोपवले होते अश्रू
बांध शेवटी उगीच फुटला... जाता जाता

"संवादाची तुझ्या ’अगस्ती’ ही तर किमया"
"रडणाराही अखेर हसला... जाता जाता"

कवी:धोंडोपंत

चाल इथे ऐका.

सोमवार, १३ जुलै, २००९

बरसेल आता पाऊस!

व्यवसायाने ज्योतिषी असणारे धोंडोपंत आपटे हे महाजालावरचे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. कविता,गजल आणि गद्य लेखन ह्या तिन्ही प्रकारात त्यांचा हातखंडा आहे.
हल्लीच त्यांनी लिहीलेली एक कविता वाचली. वाचताक्षणीच एकदम आवडून गेली आणि सहजपणाने एक चालही सुचली. माझ्या, संगीतातील काही दर्दी मित्रांना ऐकवल्यावर त्यांच्या मते ती चाल जास्त उदास झालेय असे कळले. म्हणून अजून थोड्या वेगळ्या प्रकारे मी ह्या कवितेला चाल लावलेय. दोन्ही चाली आपल्यासाठी इथे सादर करतोय. कितपत जमल्या आहेत ते ऐकून सांगा.


पाऊस

मेघांची दाटी गगनी
तू अंत नको पाहूस
क्षण दोन क्षणांची खोटी
बरसेल अता पाऊस....

चल वेचू क्षण हे सखये
ये निघून लवकर आता
मी शब्द उधळतो आहे
दे सूर तुझे या गीता...

कवी: धोंडोपंत


पहिली चाल



दुसरी चाल