शुक्रवार, २८ ऑगस्ट, २००९

गंध वार्‍यावर !

नरेंद्र गोळे ह्यांची ही चारोळी वाचली आणि आवडलीही मात्र हिला चाल कशा पद्धतीने लावावी ह्याबद्दल मनात गोंधळ होता. त्यामुळे बरेच दिवस ती बाजूलाच पडून होती. आज अचानक तिच्यासाठी चाल सुचली आणि ती तिच्या अर्थाला अनुकुल आहे असे वाटले म्हणून इथे तुमच्या अभिप्रायार्थ ठेवत आहे. ऐकून सांगा कशी वाटली?

गंध वार्‍यावर

गंध वार्‍यावर बूचफुलांचा किती |
पाय होती स्थिर, देती ना गती ||
चित्त चालतसे वळणांची वाट ती |
स्वैर धावतसे धुंद आठवांत ती ||

कवी:नरेंद्र गोळे

चाल इथे ऐका.

बुधवार, २६ ऑगस्ट, २००९

निर्माल्यातिल दोन फुले.

पुष्कराजची ही अजून एक सहजसुंदर रचना. ही चाल कशी वाटतेय ते सांगा.

र्निमाल्यातिल दोन फुले

सहज ऐकले बोलत होती
र्निमाल्यातिल दोन फुले
कालच आपण फुललो होतो
कसे विसरले लोक खुळे

जाउ दे रे सोडून दे तू
काय मनाला घेसी लावून
काय आपुले ह्यांचे नाते
जिथे सख्यांची नाही आठवण

सखे- संगती सोडून दे तू
आई-बापही अडचण होती
नीच इतुका झाला माणूस
स्वार्थास्तव रे शिवतो नाती

पाहिलास का वृद्धाश्रम तो
मालवणारे दिवे इथे
प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या
त्या वाटांचा अंत तिथे

कवी:पुष्कराज

त्रितालात गायलेली  चाल इथे ऐका.

किलबिल !

श्रीराम पेंडसे हे एक महाजालावरचे बुजुर्ग व्यक्तीमत्व. ते प्रवासवर्णन,कविता आणि योगशिक्षणासंबंधी नियमित लेखन करतात.त्यांनी केलेली एक बालकविता इथे सादर करतोय. चाल कितपत जमलेय ते ऐकून सांगा.


किलबिल

घंटा झाली, शाळा सुटली
वर्गा वर्गाची दारे उघडली
रडके हसरे चेहेरे घेऊन
मुले मुली बाहेर आली ॥१॥

आई धावली मावशी धावली
बाबा काका मागे राहिले
आपल्या ओळखीचे चेहेरे
सर्व चिमुकले शोधू लागले ॥२॥

आज शाळेत काय झालं
आया ताया विचारू लागल्या
सर्व चिमण्या उत्सुकतेने
एक सुरात किलबिलू लागल्या ॥३॥

प्रार्थना शिकवली, गोष्ट शिकवली
आकडे शिकवले अक्षरे शिकवली
नाच झाले, गाणी झाली
खूप खूप खूप खूप धमाल आली ॥४॥

चित्रे काढली, खाऊ खाल्ला
डबा मात्र नाही खाल्ला
नंतर मात्र आम्ही सगळ्यांनी
मस्तपैकी केला कल्ला ॥५॥

कवी: श्रीराम पेंडसे

चाल इथे ऐका.

मंगळवार, २५ ऑगस्ट, २००९

प्रेम - चार ओळीत !

पुष्कराजची ही छोटीशी पण अर्थपूर्ण रचना बरंच काही सांगून जाते. कविता वाचताक्षणीच चाल सुचली. कशी वाटतेय ते ऐकून सांगा.

प्रेम - चार ओळीत

मी गेल्यावर स्मरशील का रे?
आठवणींनी व्याकूळ होउन
सांग कधी तू रड्शील का रे ?

या प्रश्नाला काय म्हणावे.
आत्म्याने देहास पुसावे
मी गेल्यावर जगशील का रे ?

कवी:पुष्कराज

चाल इथे ऐका.

सोमवार, २४ ऑगस्ट, २००९

गणराज !

रे घना !

श्यामलीची ही अजून एक सहजसुंदर रचना. वाचताच चाल लावाविशी वाटली. ह्यातले ’रे घना,सांग ना’ हे शब्द खूप काही सांगून जातात. ऐकून पाहा चाल आवडतेय का ते.

रे घना

अंथरून जीव हा वाट पाहते धरा
येथ मेघ येत ना; आर्त साद अंबरा

मार्गही तोच अन नेमही असे जुना
काय येथे तुला यायचे ना पुन्हा?

रे घना सांग ना काय झाले असे?
कोण ते भेटले तुला नवे कधी कसे?

ऐक ना तुझ्याविना सर्व येथे सुने;
पाखरे न बोलती राहती उगा घुमे

भांडणास आपुल्या सोड ना अता जरा
अंथरून जीव हा वाट पाहते धरा...

कवयित्री:श्यामली



बुधवार, १९ ऑगस्ट, २००९

विठू !

क्रान्तिची ही अजून एक सहजसुंदर रचना. ह्याची चाल कशी वाटतेय ऐकून सांगा.

विठू

पुन्हा एकदा गवस विठू
रित्या अंगणी बरस विठू

दर्शन नाही सुगम तुझे
दुरून बघते कळस विठू

संतसंगती सदा घडो,
अता कुठे ते दिवस विठू ?

नित्य तुझा सहवास हवा
तुलाच करते नवस विठू

तुझ्या दयेचे अमृत दे,
जळते माझी तुळस विठू

घराकडे जा, नको करू
रखुमाईचा विरस विठू

कवयित्री: क्रान्ति


चाल इथे ऐका.