राघव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राघव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २९ डिसेंबर, २०१०

मन!

राघवची कविता वाचताक्षणीच आवडली आणि सहजपणाने चाल उलगडत गेली. सोईसाठी काही निवडक ओळीच घेतलेत.
ही आहे चाल क्रमांक ९८

मन उगाच धावतं..कशापाठी वेडावतं!
जसं लहानगं मूल प्रतिबिंबास धरतं..

मन उगाच उदास..सदा रुसल्याचा भास!
जशी कोकीळाची साद अन्‌ नुसताच त्रास!!

मन उगाच निस्तब्ध..काळजाचा थरकाप..
जसा स्तब्ध पाण्यावर, उठे तरंग..अश्राप!

मन उगाच तत्वज्ञ, करी अनंत विचार..
जशी अळवाच्या पानी मोतियाची थरथर!

मन उगाच अल्लड..दोन अश्रुंची झिम्मड!
जशी पावसाची सर..अलगद..अलवार..

मनं जुळून येतात..हातांमधे दोन हात..
जशी रात्र दिवसाची उलगडते पहाट!!

कवी: राघव

चाल इथे ऐका.

बुधवार, ८ डिसेंबर, २०१०

तुला ना कळे लोचनांची कहाणी..

राघव उर्फ राहुल पाटणकरची ही आर्त रचना वाचून मला चाल सुचली ती अशी...


जरी व्यक्त होती मनी आर्त गाणी..

तुला ना कळे लोचनांची कहाणी..


नदी-सागराची घडे भेट साधी..

तरी, अंतरी, छेडते सूर आधी!

शब्दांविना बोलते मूकवाणी..

तुला ना कळे लोचनांची कहाणी..


कधी भासती, भास झाले खरे हे!

कधी श्वास माझा उगा अडखळे रे!!

सुखाची दरी, ही अशी जीवघेणी..

तुला ना कळे लोचनांची कहाणी..


नको रे असा दूर जाऊ सख्या तू..

सुगंधाविना मोगरा पोरका तू..

सांगू कसे, का फुले - रातराणी!!

तुला ना कळे लोचनांची कहाणी..

कवी: राघव

चाल इथे ऐका.

गुरुवार, २३ एप्रिल, २००९

सावली!

राघवची ही अजून एक सहजसुंदर रचना. वाचता वाचताच चाल सुचली.

सावली

भारलेली रात्र सारी चंद्र आहे संगती,
गारवेला गार वारा वाहतो सभोवती,
पारिजाता पालवीची आस आहे लागली
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

चांदणे पाण्यात बघता भास होई अंतरी,
गूज काही सांगण्यासी नभ उतरले भू वरी,
हलकेच काही बोलणारी रात्र कैसी रंगली,
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

गाज येई सागराची धुंदल्या तालावरी,
बोल सारे रेखणारी लाट होई बावरी,
त्या किनार्‍याच्या शिवारी प्रेमवीणा गूंजली,
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

कवी:राघव
चाल इथे ऐका.

रविवार, ५ एप्रिल, २००९

प्रेमे नादली पंढरी!




राघव ह्या टोपण नावाने लिहीणारा राहुल पाटणकर हा देखिल एक उमदा कवी आहे. ह्याचा नैसर्गिक कल अध्यात्माकडे असावा त्यामुळे त्याच्या कविता भक्तीरसमय असतात. त्याची ही कविता वाचून जी चाल सुचली ती ऐका..   विवेक काजरेकरांच्या आवाजात.
विवेक काजरेकरांनी ह्या गीताला जो संगीत-साज चढवला आहे तो पूर्णपणे संगंणकीय पद्धतीने.
ह्यात दिमडी,एकतारी,झांज,सतार आणि वायोलिन्सचा वापर केलाय. अर्थात ह्यात प्रत्यक्षपणे कोणतीच वाद्ये वापरलेली नाहीत.


प्रेमे नादली पंढरी

मेघ आषाढाचा गर्जे, गाज गूंजे चराचरी,
प्रेमे नादली पंढरी उभा बघून श्रीहरी!

मी बालक अजाण मन सोडीना पदर!
माझी बालकाची मती त्यास कोठला आधार?

दिंडी चालली माहेरा, वाट ओली अंतरीची!
उभी लेकराच्यासाठी माय सावळी कधीची!!

अश्रू वाहती सहज, भाव कोवळा सांभाळा!
मायभेट उराउरी आज आनंद सोहळा!!

कवी:राघव