सुवर्णमयी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सुवर्णमयी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २००९

नको फिरून बोलणे.

सोनाली जोशी उर्फ सुवर्णमयीची ही एक मस्त गजल वाचल्यावर साहजिकच तिला चाल लावाविशी वाटली.मूळ गजलेत एकूण ६ द्विपदी आहेत. मी फक्त पहिल्या चारांचाच ह्यात समावेश केलाय. ऐकून सांगता का कशी वाटली चाल?

नको फिरून बोलणे


नको फिरून बोलणे नकोच आज भेटणे
नकोच तेच लाजणे नकोच दूर सारणे

इथे तुझ्याविना झुरून गप्प राहती फुले
लुटून गंध ने जरा.... हवे तुझे दुखावणे

तनामनात आजही तुझाच श्वास राहतो
फिरून आठवे मला तुझेच छेड काढणे

जशा सरी अधीरती बघून उष्ण ही धरा
तुला कधी जमेल का नभासमान भेटणे

किती बघायची तुझी इथे खुलून वाट मी?
वरून आठवायचे तुझे मधाळ बोलणे

निघू म्हणून अंगणात थांबतोस तू जरा
सुरूच राहते युगात त्या क्षणास गुंफणे

कवयित्री:सुवर्णमयी

चाल इथे ऐका.

सोमवार, ६ एप्रिल, २००९

प्रेमरंग!

प्रेमरंग ही सुवर्णमयीची अजून एक सहजसुंदर कविता वाचा आणि त्या कवितेची चालही ऐका.

प्रेमरंग

प्रेमरंग मज भिजवुन गेला उमलुन आले फूल नवे
आयुष्याच्या माळावर तृप्तीला आले कोंब नवे

तुला पाहण्या भिरभिर फिरतो , तुला भेटण्या बहाणे नवे
हृदयामध्ये तुझेच स्पंदन वाटे मजला हवे हवे

बोललीस तू हळूच काही..तिथे थांबले क्षण हळवे
डोळ्य़ामधुनी हसल्या ज्योती उजळून गेले लाख दिवे

आशेच्या फांदीवर माझ्या वसतीला चैतन्यपारवे
सखे व्यापले गगनालाही पसरून माझे पंख नवे

कवयित्री: सुवर्णमयी

रूपक तालातली चाल ऐका.

तूच सूर!

तूच सूर ही सुवर्णमयीचीच अजून एक आशयघन कविता आहे. मला चालही त्या कवितेतच सापडली.

तूच सूर

तूच सूर तुच साज, तूच गीत तूच प्रीत
जाणतो समीर धुंद ,तेच गीत तीच प्रीत

वाजते मधूर बीन , घालते कुणास साद
तोच चांद तीच रात , तोच छंद तोच नाद

धुंद फूल , धुंद पान , चांदणे कशात दंग
नाचले खुशीत भृंग ,उमटले पहा तरंग

ये मिठीत सोड रीत , आळवून मालकंस
बोलवी सखीस खास , डौलदार राजहंस

कवयित्री: सुवर्णमयी

चाल इथे ऐका.

तुझ्याविना!

सुवर्णमयीची तुझ्याविना ही कविता देखिल अतिशय भावपूर्ण आहे. ह्या कवितेला मी थोडीशी उडती चाल दिलेय. पाहा आवडतेय का?

तुझ्याविना

अंबरात चांदणे खुलेना तुझ्याविना
अंगणात या फुले फुलेना तुझ्याविना

खुळे प्रश्न अन्‌ खुळी उत्तरे
स्वप्न राहिले सखे अपुरे
या जगण्याचा मेळ जमेना.....तुझ्याविना

मौनाशी संवाद चालला
सूर सूर हा असे एकला
श्वासामधुनी गीत झरेना......तुझ्याविना

सुकून गेली सगळी माती
पडू लागले तडे भोवती
उदासरस्ता अता सरेना.....तुझ्याविना

चालून आलो कितीक अंतर
चालायाचे वणवण कुठवर
आयुष्याला दिशा मिळेना.....तुझ्याविना

कवयित्री: सुवर्णमयी

इथे ऐका चाल.

कसे मी जगावे!

सुवर्णमयी ह्या टोपण नावाने कविता लिहीणारी सोनाली जोशी ही देखिल एक उत्तम कवयित्री/लेखिका आहे. मनोगत ह्या संकेतस्थळावर ती नियमितपणे लेखन करते. कसे मी जगावे ह्या तिच्या कवितेतच चाल दडलेली होती. मी फक्त ती आपल्यासमोर मांडलेय.

कसे मी जगावे

कधी चित्र रंगाविना का खुलावे
सखे एकट्याने कसे मी जगावे ॥धृ॥

तुझे गीत ओठावरी खेळतांना
कधी पैंजणाना तुझ्या छेडतांना
अकाली कसे स्वप्न माझे तुटावे ॥१॥

न येती सरी त्या न तो धुंद वारा
उरे फक्त हा आठवांचा पसारा
तुझ्या आठवांनी किती मज छळावे.. ॥२॥

उभी अंगणी तू फुले वेचतांना
असा भास होतो कधी चांदण्यांना
चकोरापरी मी मनाशी झुरावे.. ॥३।

किती अंत माझा सखे तू पहाशी
रुसूनी असे का गडे दूर जाशी
सुखाच्या फुलांनी कसे मग फुलावे.. ॥४॥

कवयित्री:सुवर्णमयी
इथे ऐका चाल.