शनिवार, २४ जुलै, २०१०

हा तोच किनारा फिरतो मी

राजेश घासकडवी ह्यांची ही तरल भावना व्यक्त करणारी कविता वाचा....कविता वाचता वाचताच तिची चालही अलगदपणे उलगडत गेली. कशी ते ऐका......

उजव्या बाजुस गजबजणारी तीच गाज घुमते अरबी
हा तोच किनारा फिरतो मी ।।धृ।।

दगडावरती झोकुन सारे
वार्‍यामनिचे गुपित खारे
लेउन लाटा उधळण करती तीच तुषारांची धुंदी ।।१।।

तोच दिवस त्या महिन्याचाही
तोच कोन त्या किरणांचाही
परंतु पृथ्वी सूर्याभवती व्यर्थ फेर फिरली काही ।।२।।

धरून ऐना कुंद हवेला
तनामनाने हिरवुन गेला
तसा न सागर आज सांगतो जन्मजन्मीच्या गुजगोष्टी ।।३।।

केसांमधल्या लाटा सारत
शब्दहासरे तुषार बरसत
उजव्या बाजुस गाज रोखुनि चालत तू ना मजसाथी ।।४।।

काय बोललो तेव्हा आपण
कसे कुठे अन गेले ते क्षण
मनात ओल्या रेतीवरच्या त्याच खुणा धरल्या जपुनी ।।५।।

डाव्या बाजुस गाज अता ही
सूर्यास्ताची सरते तरिही
जादू उरली अजुनी अपुल्या स्पर्शधुंदीच्या लाटांची ।।६।।

कवी: राजेश घासकडवी

चाल इथे  ऐका

गुरुवार, २२ जुलै, २०१०

गाणी

क्रान्तिची ही अजून एक आशयघन कविता वाचा...त्यानंतर मला सुचलेली चालही ऐका.

आज अचानक जागी झाली
कधीतरी निजलेली  गाणी
सांजवात होऊन तेवली
मनातली विझलेली गाणी ||

दबले, बुजले, घुसमटलेले
सूर विजेसम  लख्ख चमकले,
घन बरसावे तशी बरसली
कंठातच थिजलेली गाणी ||

भुरभुरता पाऊस कोवळा
संध्यारंगातून  झिरपला,
किरणांच्या छायेत उतरली
थेंबांवर सजलेली गाणी ||

नवथर मातीच्या ओलेत्या
देहाच्या परिमलात घुमली,
दरवळली अन तिच्या कुशीतुन
कोंबांसह रुजलेली गाणी ||

निळेसावळे ओले अंगण,
तुझ्या नि माझ्या मनात श्रावण,
रानोरानी, पानोपानी
भिरभिरती भिजलेली गाणी ||

असाच अवखळ पाउस होता,
अन उडणारी एकच छत्री,
आठवली का हळूच माझ्या
कानी कुजबुजलेली गाणी?

कवयित्री: क्रान्ति

चाल इथे ऐका.

बुधवार, २१ जुलै, २०१०

अंतरंग

जयपाल ह्यांची ही साधी सोपी अशी रचना वाचून मला जी चाल सुचली ती ऐका.



पावसाच गाणं
मातीच न्हाणं
माझ समुद्र होण
अंतरंगी

ओला पक्षी
हिरवी नक्षी
मी एक साक्षी
अंतरंगी

चींब सर
ओली थरथर
अधिर हे अधर
अंतरंगी

उठे उधाण
नुरे देहभान
मन हे तुफान
अंतरंगी

झाकल्या खुणा
उघड्या पुन्हा
घडे काय गुन्हा?
अंतरंगी

कवी: जयपाल

चाल इथे ऐका

अरूपाचे रूप

आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने क्रान्तिने रचलेल्या ह्या अभंगाला मी चाल लावलेय...ऐकून पाहा आणि आवडली/नावडली तर तेही सांगा.

अरूपाचे रूप | श्रीहरी स्वरूप
पाहता तद्रूप | जीव होई


भक्तांचियासाठी | चंद्रभागेकाठी
उभा जगजेठी | पंढरीत


दीनांचा कैवारी | सावळा मुरारी
संकटात तारी | पांडुरंग


भाव तेथे देव | नांदतो सदैव
कैवल्याची ठेव | अंतरात


मायबाप, भ्राता | तूच सखा, त्राता
रुक्मिणीच्या कांता | दे दर्शन

कवयित्री: क्रान्ति

चाल इथे ऐका.