रविवार, १७ मे, २००९

गणेशवंदना!

’क्रान्ति’ने रचलेली ही गणेशवंदना पाहा. मुळात तिने हे मालकंस राग डोक्यात ठेवून लिहीलेय. त्याप्रमाणे मी ह्या गीताला मालकंसात चाल बांधलेय(त्यात काय विशेष म्हणा) आणि त्याच वेळी ही रचना मला भूप रागातही करावीशी वाटली. तेव्हा ऐका दोन्ही रचना.

गणेशवंदना!

सकल कलांचा उद्गाता
गुणेश गजानन भाग्यविधाता ||धृ||
प्रथम पूज्य हा शिवगौरीसुत
गणनायक शुभदायक दैवत
या विश्वाचा त्राता विनायक या विश्वाचा त्राता ||१||
आदिदेव ओंकार शुभंकर
मी नतमस्तक या चरणांवर
तू विद्येचा दाता गजमुखा तू विद्येचा दाता ||२||

क्रान्ति

दोन्ही चाली इथे ऐका.

१)भूप रागातली.
गायन आणि पेटीची साथ: केदार पवनगडकर
तबला: सुहास कबरे




२) मालकंसातील
ही मीच गायलेय....

मंगळवार, १२ मे, २००९

गान समाधी

नागपुरचे तुषार जोशी हे देखिल एक अष्टपैलू व्यक्तीमत्व आहे. लेखक/कवी म्हणून त्यांनी भरपूर लेखन केलेय. त्यांची ’गान समाधी’ ही कविता वाचताच लगेच चाल लावाविशी वाटली. आधी मी भैरवीत चाल लावली होती पण का कुणास ठाऊक ह्या कविततेल्या आशयाला ती पूरक वाटली नाही म्हणून मग मी ही दुसरी चाल लावली. ऐकून सांगा कशी वाटतेय ती?

गान समाधी

आलाप असा की नव चैतन्य जागे
तृप्त मनाने गान समाधी लागे

एकेक सूर उजळतो आयुष्याला
आनंद सुरांच्या धावे मागे मागे

मज कुणी नको साथ कराया आता
माझे जगणे तर फक्त सुरांनी भागे

आयुष्याचा रत्न जडित हा शेला
विणतो मी घेऊन सुरांचे धागे

तुषार जोशी, नागपूर

इथे चाल ऐका.

ती संपली कहाणी !

जयंता५२ ह्या नावाने गजल/कविता लिहीणारे जयंतराव कुलकर्णी हे नियमितपणे मनोगत ह्या संकेतस्थळावर आपले लेखन करतात.त्यांची ’ती संपली कहाणी’ही गजल वाचली आणि चाल लावण्याची उर्मी आली. अतिशय कमी शब्दात नेमका आशय मांडणारी ही गजल छोट्या बहरमधील असल्यामुळे हिची चाल पारंपारिक गजलेच्या अंगाने जात नाहीये.

ती संपली कहाणी

ती संपली कहाणी
आता नको उजळणी

घडले नवे न काही
अन् कारणे पुराणी

माझ्या सवेच झाली
ही आसवे शहाणी

मी शीळ घालतो, ती
का भासते विराणी?

राजा नसेन मी, पण
गोष्टीत तूच राणी!.


कवी: जयन्ता५२

रूपक तालात गायलेली  चाल इथे ऐका.