गुरुवार, १८ ऑगस्ट, २०११

जगणे

जगण्याचा हा अपुला हेतू
पोटासाठी फक्त भाकरी
दडवून स्वप्ने खिशात; धरतो
संसाराची बरी चाकरी

अतृप्तीतून तृप्ती शोधत
उगा मधाचे बोट लावतो
दो मिनिटांच्या शृंगारातून
मला वाटते देव पावतो

चौकटीतल्या पोकळीत मी
उगीच जगतो, उगीच मरतो
अमृत सोडून आयुष्यातील
हलाहलाचा हिशेब करतो

कवी: उमेश कोठीकर

इथे चाल ऐका.

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०११

न्या येथून!

तुज दशदिशा
उरे मज काय ?
रे चरण द्वय
देवा तुझे


केलास उशीर 
जरी आजवरी
तृप्त झालो हरी
तुझ्या ठायी !



तुझ्याच कृपेने
आलो इथवर
ही माझी स्थावर
मालमत्ता !


भेटूनि पावलो
हे जगदिश्वरा
आता त्वरा करा
 येथून न्या  !

कवी: सुरेश पेठे
ह्या गीताला मला सुचलेली चाल ऐका.

रविवार, ७ ऑगस्ट, २०११

हाण त्याच्या टाळक्यात: नागपुरी तडका


ऊठ मर्दा ऊठ
आवळून घे मूठ
हाण त्याच्या टाळक्यात
पायामधला बूट

सत्तेपुढे शहाणपण
जेव्हा व्यर्थ जाते
माणुसकीचे लचके तोडून
लाचखोर खाते
पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

अन्यायाची सीमा जेव्हा
मर्यादेला लांघते
तुझे हक्क तुडवून
तिरडीवर बांधते
शेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा ऊठ
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

पोशिंद्याच्या छाताडावर
हरामींच्या मौजा
तेव्हा राज्य करतात
लुटारूंच्या फौजा
सत्ता आणि दलालांची, कर ताटातूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

माय तुझी बैलावाणी
राबराबून मेली
गल्लीमध्ये मुळं अन्
दिल्लीमध्ये वेली
अभयाने शोध घे, कोणी केली लूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट


ह्या गीताला मला अशी चाल सुचली.