शनिवार, २ एप्रिल, २०११

कळ्यांना जागवूनी बोलले दव

कळ्यांना जागवूनी बोलले दव
"उरे दो-चार घटकांचेच शैशव"

प्रिये, तोरा गुलाबाचा असावा
नि मोहाच्या फुलांचे धुंद आसव

अता उमलावयाची वेळ झाली
सख्याचे नादती बागेत पदरव

मधाचे बोट आता खूप झाले
उधाणू दे मधाचा मत्त अर्णव

दवाचा स्पर्श अन्‌ चुंबन अलीचे
कळी खुलते नि घडतो संगमोत्सव

धुक्याच्या चादरीने फूल झाकी
जणू उन्मीलितेचे तृप्त सौष्ठव

जराही ना दुखवता फूल खुडणे
असे याहून काही हस्तलाघव ?

किती, 'भृंगा', तुझी, रे, दांडगाई
अशा वेळी हवे रेशीम मार्दव...

कवी: मिलिंद फणसे

मिलिंदरावांची ही गझल वाचून मला स्फुरलेली चाल खाली ऐका. सोईसाठी काही निवडक द्विपदी घेतल्या आहेत.

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०११

मराठी!

नररत्नांची खाण मराठी
सदैव उन्नत मान मराठी
अजिंक्य आहे आणि राहील
भारतभूची 'जान' मराठी

पक्ष्यांची ही साद मराठी
कडे कपारी, नाद मराठी
'हर हर हर' डरकाळी फुटते
विजयाचा अस्वाद मराठी

लाजलाजिरी रात मराठी
महाराष्ट्राची बात मराठी
गवतांनाही भाले फुटती
त्या हिरव्या कोंबात मराठी

या मातीचा श्वास मराठी
या दर्याचा न्यास मराठी
या व्योमाच्या अणुरेणूतून
वसते अमुची खास मराठी

या दुर्गांची माळ मराठी
कधी न तुटते नाळ मराठी
वरून कणखर, आतून हळवे
हृदयामधले बाळ मराठी

धरतीच्या उदरात मराठी
कधी न सोडी साथ मराठी
या देशातून प्रेम वाहते
या देशाची जात मराठी

कवी:उमेश कोठीकर

ही कविता वाचून मला सुचलेली चाल ऐका.

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०११

हॉं मै शायद नही थी....

हाँ मैं शायद नहीं थी उन कतारों में
आप की महफिल जहॉं सजी थी प्यारो में

रात मुझे हसीं सपने दिखा गयी
वैसे सुबह भरी हुवी थी तकरारो में

कहो तो जान दे दू साबित करने प्यार अपना
पर फिर तुम क्या पाओगे मुझे मजारों में

आँख में आंसू, हंसी लबो पे
अभिनय सीख लिया है अनेक किरदारों में

क्या कभी कोई मुझको याद करे?
क्या हुं मै कही किसी के विचारों में

कवयित्री: प्रिती कोलेकर

प्रितीची ही कविता वाचून मला अशी चाल स्फुरली.



अजून दुसरी एक चाल ऐका.

रविवार, ६ फेब्रुवारी, २०११

सारे संपले!

ती म्हणाली काल जेव्हा, "चालले",
खोल या हृदयात उठली वादळे

"येत नाही, तोच घाई जायची
रीत कसली ही तुझी समजायची?"
"सोड ना रे, वाट अंधारायची!"
का तुला माझी असोशी ना कळे?
खोल या हृदयात उठली वादळे

"रंगते मन आजही भासामध्ये
श्वास माळू दे जरा श्वासामध्ये"
"अर्थ आहे या खुळ्या ध्यासामध्ये?"
जाणतो, आशा तरी ना मावळे!
खोल या हृदयात उठली वादळे

"हात हाती राहु दे, सोडू नको,
हास्य या ओठांतले मोडू नको!"
"जीवनाची वेस ओलांडू नको!
थांब ना, अडती तुझीही पावले!"
खोल या हृदयात उठली वादळे

"तो उभा दारी, कसे थांबायचे?
तो जिथे नेईल तेथे जायचे
तू मला स्मरणात सांभाळायचे!"
एवढे बोलून सारे संपले!
खोल या हृदयात उठली वादळे

कवयित्री: क्रान्ति

क्रांतिची ही जीवघेणी कविता वाचून माझ्या पूर्वस्मृती जाग्या झाल्या आणि नकळतपणे मी असा वाहवत गेलो.

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०११

चित्रकविता!

सुरेश पेठेसाहेब अतिशय सुंदर सुंदर चित्र रोज काढत असतात आणि ती तुम्हा आम्हाला पाहायलाही मिळतात. त्यांनी आपल्या चित्रांचा संग्रह फेसबुकवर चढवलेला आहे. इथे नमुन्यासाठी एक चित्र जोडलंय..बाकीची चित्र आपण ह्या दुव्यावर पाहू शकता.
















ह्या चित्रसंग्रहासाठी त्यांनी एक चारोळी लिहिलेय..तिला जी चाल सुचली ती आपल्याला खाली ऐकता येईल.


मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

चित्रकविता!

















सौ. अलका चित्तरंजन पटवर्धनांच्या ह्या चित्रातली चारोळी वाचून मला सुचलेली चाल इथे ऐका.

शुक्रवार, १४ जानेवारी, २०११

टाळले सार्‍या दिशांनी

क्रान्तिच्या ह्या गजलेला मला सुचलेल्या दोन चाली ऐका.(चाल क्रमांक १०३)

टाळले सार्‍या दिशांनी सांगणे माझे
आणि झाकोळून गेले चांदणे माझे

हारला तो डाव, त्याची चूक ही नाही,
चूक होती डाव त्याचा मांडणे माझे!

ऐन मध्यान्हीच गेला सूर्य अस्ताला,
त्या क्षणाला सिद्ध झाले थांबणे माझे

जाणत्यांनी जाणले नाही, न जाणे का?
जाणिवांचा उंबरा ओलांडणे माझे!

मी तुला भेटून येताना मुकी होते
रात्र माझी, चंद्र माझा, चांदणे माझे!

कोणत्या माझ्या चुकीची ही सजा आहे,
दैव एका वादळाशी बांधणे माझे?

कवयित्री: क्रान्ति

इथे चाल ऐका

१)


२)