गुरुवार, २३ एप्रिल, २००९

सावली!

राघवची ही अजून एक सहजसुंदर रचना. वाचता वाचताच चाल सुचली.

सावली

भारलेली रात्र सारी चंद्र आहे संगती,
गारवेला गार वारा वाहतो सभोवती,
पारिजाता पालवीची आस आहे लागली
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

चांदणे पाण्यात बघता भास होई अंतरी,
गूज काही सांगण्यासी नभ उतरले भू वरी,
हलकेच काही बोलणारी रात्र कैसी रंगली,
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

गाज येई सागराची धुंदल्या तालावरी,
बोल सारे रेखणारी लाट होई बावरी,
त्या किनार्‍याच्या शिवारी प्रेमवीणा गूंजली,
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

कवी:राघव
चाल इथे ऐका.

रविवार, १९ एप्रिल, २००९

माझा वसंत!

क्रान्तिची ही अजून एक सुंदर रचना मला आवडली आणि मी ही चाल लावली. मराठीत गाजलेल्या एखाद्या गाण्यासारखीच वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ;) कारण चाल आपोआप उलगडत गेली. मुद्दामून वेगळी चाल लावावी असे नाही वाटले.

माझा वसंत

ग्रीष्मातल्या उन्हाची काही न खंत आता
आला फिरून आहे माझा वसंत आता

आताच मी मनाला समजावले जरासे
दु:खातुनी मिळाली थोडी उसंत आता

वारा फिरे भरारा माझीच गात गाणी
माझी कथा जगाला सांगे दिगंत आता

केव्हातरी सुरांशी जुळतील शब्द माझे
या कल्पनेत जगणे आहे पसंत आता

दाही दिशा उभ्या या उघडून सर्व दारे,
माझ्या मुशाफिरीला वाटा अनंत आता

कवयित्री:क्रान्ति
चाल इथे ऐका.


शुक्रवार, १७ एप्रिल, २००९

चित्कला!

वारसे.

’वारसे’ ही मिलिंद फणसे ह्यांची अजून एक सशक्त गजल. गजल वाचताच चाल लावाविशी वाटली.

वारसे

गाव हा नाही तुझा, ना तुझी ही माणसे
सोड सारे, जा पुढे, पूस जाताना ठसे

कैकदा हृदयाहुनी भिंत ओली पाहिली
मी मनांचे पाहिले उंबरे बेजारसे

सावली शोधावया वृक्ष वणवणती इथे
अन् स्वतःला पाडण्या बिंब शोधी आरसे

जाहले आशीषही वास्तुपुरुषाचे मुके
सोयर्‍यांचे चेहरे कोरडे; मौनी घसे

वडिलधार्‍या सावल्या दे मला माध्याह्निला
ना तरी दे घन तमी वाट-चुकले कवडसे

पावसाचे आगमन दूर नाही फारसे
चेहर्‍यावर काजळी, नेत्रही गर्भारसे

विहर तू बागेत पण विहर चिलखत घालुनी
भृंग, बाणांचे इथे फूल सांगे वारसे

कवी: मिलिंद फणसे
इथे चाल ऐका.

गुरुवार, १६ एप्रिल, २००९

लोपला स्वयंभू गंधार!

प्रशांत मनोहर हा एक उमदा कवी/लेखक आहे. त्याने लिहीलेल्या ’लोपला स्वयंभू गंधार ’ ह्या कवितेला मी लावलेली चाल ऐका....प्रशांतचे असे म्हणणे आहे की.....तंबोरा जेव्हा सुरात लागतो तेव्हा त्याच्या चार तारांतून एक सुंदरसा ’गंधार’ साकार होत असतो. ह्या कवितेत पहिल्या चार ओळींमध्ये जे वर्णन केलेले आहे तेही त्या गंधारबद्दल समर्पकपणे व्यक्त झालंय...म्हणूनच पाचवी ओळ कंसात घातलेय.

अनंगरंग !

अनंगरंग ह्या मनीषाच्या एका सुंदर कवितेला मी दोन चाली दिलेत. एक एकदम माझ्या सहजप्रवृत्तीविरुद्ध चाल दिलेय आणि दुसरी नेहमीचीच चाल आहे.. ऐकून सांगा कशा वाटताहेत.


अनंगरंग

धुंद एकांत हा - तुझ्या सवेच रंगतो
प्रणयाचा पूर ही हृदयी या उधाणतो ।

स्पर्श स्पर्श जागवी अनोखीच चेतना
श्वास श्वास धुंद हा तनूवरी विसावतो ।

उष्ण अधर कापती - रंगती कपोलही
मुक्त कुंतलात या जीव तुझा गुंततो ।

झंकारे देहवीणा तुझीया कवेत रे
रासझूला चांदवा - अनंगरंग उसळतो ।

विखूरले उशीवरी चांदणे अजूनही
न्हाऊनी प्रीतीत मन मोगराही उमलतो ।

बरसत्या चांदण्यात तारकांच्या मैफिली
रातराणी बहरे, धुंद चाफा दरवळतो |

कवयित्री: मनीषा
चाल इथे ऐका.
पहिली चाल


दुसरी चाल

गुरुवार, ९ एप्रिल, २००९

भूल!

बेसन लाडू ह्या टोपण नावाने लिहीणारा चक्रपाणी चिटणीस हा एक उत्तम गजलकार आहे. तो गद्यही तितक्याच समर्थपणे लिहीतो.
’भूल’ ह्या त्याच्या गजलेतच चाल दडलेली होती ती मी फक्त आपल्यासमोर मांडतोय.नेहमीप्रमाणे निवडक शेर घेतलेत चाल ध्वमुसाठी. :)

भूल

पांघरायला विस्मरणांची झूल नको आता!
आठवायला काटे पुष्कळ! फूल नको आता

हवे करीअर, हवे प्रमोशन्, माडी अन् गाडी
हवी 'मजा' प्रणयातसुधा, पण मूल नको आता

मिटक्या मारत गिळून घेताना ओव्हनमधले,
मऊभात, भाकरी ...?... धूर अन् चूल नको आता

लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो,
पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता

गंधित वारा तुझ्या गावचा - पण मी गुदमरतो
(मिणमिणत्या श्वासास तुझी चाहूल नको आता)

सुदैव माझे कुणी पळवले मलाच ना पत्ता,
उरलेलेही लुटायचे तर भूल नको आता!

मिठीत घे रे, कुशीत घे, विठ्ठला जरा आता
नाळ जिण्याशी घट्ट करे तो पूल नको आता

कवी:बेसन लाडू

चाल इथे ऐका.