उमेश कोठीकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उमेश कोठीकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०११

जगणे

जगण्याचा हा अपुला हेतू
पोटासाठी फक्त भाकरी
दडवून स्वप्ने खिशात; धरतो
संसाराची बरी चाकरी

अतृप्तीतून तृप्ती शोधत
उगा मधाचे बोट लावतो
दो मिनिटांच्या शृंगारातून
मला वाटते देव पावतो

चौकटीतल्या पोकळीत मी
उगीच जगतो, उगीच मरतो
अमृत सोडून आयुष्यातील
हलाहलाचा हिशेब करतो

कवी: उमेश कोठीकर

इथे चाल ऐका.

गुरुवार, २८ जुलै, २०११

स्पंदन!

शरीराचे जरी मिटती डोळे
स्वप्नांचे ना मिटो कधीही
स्वप्नांसाठी प्रीत चालते
जन्मांची मग सप्तपदी ही

मांडीवरती निजवून देती
डोळ्यांसाठी स्वप्न माऊली
पहाट होता रूप धारिती
या देहाची जशी सावली

हृदयामध्ये शिरतो साजण
डोळ्यांमधूनी स्वप्नमिषाने
रास रंगतो आठवणींचा
स्पंदनझोका म्हणतो गाणे

भिजल्या भिजल्या आठवणींचे
स्वप्न पेरिती गुलाब नयनी
कधी वाहती विरहाने अन
जसे चांदणे डोळ्यांमधूनी

प्रणयाचा हा स्पर्श लाभता
असा सांडतो स्वप्नांचा मद
अदलाबदली स्वप्नांची मग
ओठांमधूनी होते अलगद

कवी: उमेश कोठीकर

ह्या कवितेला मला सुचलेली चाल ऐका.

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०११

मराठी!

नररत्नांची खाण मराठी
सदैव उन्नत मान मराठी
अजिंक्य आहे आणि राहील
भारतभूची 'जान' मराठी

पक्ष्यांची ही साद मराठी
कडे कपारी, नाद मराठी
'हर हर हर' डरकाळी फुटते
विजयाचा अस्वाद मराठी

लाजलाजिरी रात मराठी
महाराष्ट्राची बात मराठी
गवतांनाही भाले फुटती
त्या हिरव्या कोंबात मराठी

या मातीचा श्वास मराठी
या दर्याचा न्यास मराठी
या व्योमाच्या अणुरेणूतून
वसते अमुची खास मराठी

या दुर्गांची माळ मराठी
कधी न तुटते नाळ मराठी
वरून कणखर, आतून हळवे
हृदयामधले बाळ मराठी

धरतीच्या उदरात मराठी
कधी न सोडी साथ मराठी
या देशातून प्रेम वाहते
या देशाची जात मराठी

कवी:उमेश कोठीकर

ही कविता वाचून मला सुचलेली चाल ऐका.

गुरुवार, १३ जानेवारी, २०११

प्रणयगीत!

उमेश कोठीकरची ही अजून एक प्रणयी रचना वाचून चाल सुचली ती ऐका.(चाल क्रमांक १०२)

भिजून यावा गंधित वारा, लाजत यावी रात्र जराशी
तुझ्या मनातील गूज कळावे, मला धरावे असे उराशी


तुझ्यातले माझ्यात मिळावे, फक्त श्वास श्वासांचे यावे
ओठांच्या या मिठीत न कळे, काय बोलले कोण कुणाशी?


डोळ्यांमधले शब्द कळावे, लज्जेचे हे बंध गळावे
स्पर्शाआधी उमलून यावी, गर्द गुलाबी लाज जराशी


अंतर व्याकुळ मिटून जावे,एक होऊनि चिंब भिजावे
असे काहीसे मिसळून जावे,मी तुझ्यात अन तू माझ्याशी


मिटून डोळे, सुखात न्हावे, तनामनातून तूच भिनावे
नकोस आता थांबू सखया, फुटून गेला बांध मघाशी


तृप्त पहाटे तुला बघावे, 'नकोस जाऊ' म्हणत रूसावे
आठवणींचे चुंबन गहिरे, जातांना तू ठेव उशाशी

कवी: उमेश कोठीकर

चाल इथे ऐका

बुधवार, १२ जानेवारी, २०११

धुंदी!

उमेश कोठीकरच्या ह्या गुलाबी ’धुंदी’ला लावलेली ही चाल ऐका.(चाल क्रमांक १०१)
नव्या वर्षातली ही माझी पहिलीच चाल आहे.

डंखता मग ओठ ओठी
मी गुलाबी नाहतो
पाहतो मग, पाहतो जे
ते गुलाबी पाहतो

तू अशी अन मोगरा हा
आग गंधित लावतो
धावतो मग देह सारा
रिक्त होण्या धावतो


धुंदते लावण्य जेंव्हा
स्वर्ग देही पाहतो
दाहतो मग ओठ होण्या
देह माझा दाहतो


तो शहारा तृप्त अन
अतृप्त मी का वागतो?
मागतो मग मी पहाटे
तो शहारा मागतो


धुंदीचा हा दंश ताजा
नित्य हृदयी वाहतो
राहतो तुझ्यात काही
अंश माझा राहतो

कवी: उमेश कोठीकर

चाल इथे ऐका.

रविवार, १९ डिसेंबर, २०१०

ओढ

उमेश कोठीकरची ही निसर्गरम्य कविता वाचली आणि ही चाल सुचली.


धारित्रीच्या स्वयंवराला, मेघ बरसती असे निरंतर
या मातीतून मोती येतील, हा सृष्टीचा कुठला मंतर?

मेघपंख हे निळे लावूनी, या वार्‍याचे गीत गाऊनी
बरसून जाऊ पंखांसमवे, विहरत आपण असे दिगंतर

आठवणींचे श्वास असू दे, निकट तुझा आभास असू दे
मिटवून टाकू थरथरणार्‍या, श्वासांचे हे उत्कट अंतर

मृदगंधाला अंगी भिनू दे, हिरवे हिरवे हृदय होऊ दे
या हृदयातील प्रेमफुले ही, डोलत ठेवू अशी अधांतर

श्रावणात या चिंब न्हाऊनी, ऋतु सावळा मनी लेवूनी
ओढ रेशमी गर्दगुलाबी, दो हृदयांना जशी समांतर

या मातीची आस असू दे, येऊ परत विश्वास असू दे
कालचक्र हे विसरून जाऊ, मिठी असू दे युगे निरंतर

मनामनाच्या उजळून वाती, सजवू गहिर्‍या श्रावणराती
काय चूक अन काय बरोबर, ठरवू बाकी आपण नंतर!

कवी: उमेश कोठीकर

त्रितालात गायलेली चाल इथे ऐका.

शुक्रवार, १० डिसेंबर, २०१०

पाऊस!

उमेश कोठीकरच्या ह्या कवितेतला पाऊस पाहून मलाही बरसावंसं वाटलं. ;)
ह्या कवितेला सुचलेली चाल ऐकून सांगा ,कितपत आवडली ते.


भेगाळ या धरेच्या, शिरतो तनात पाऊस

मृदगंध भिनवितो, हसतो फुलांत पाऊस


हिरवाच ढंग सगळा, हिरवी वसुंधरा ही

हिरवेच कोंब येती, हिरव्या दिशांत पाऊस


का आस ही फिटेना, का चिंब मी भिजेना?

ही भूक जागवितो, कसली तनात पाऊस?


हा मोर का विभोर, अतृप्त का चकोर?

हे थेंब आठवांचे, स्त्रवतो मनात पाऊस


भिजवून यौवनाला, कटी चिंब हा अकार

जणू थाप ही मृदंगी, देतो दिलात पाऊस


बरसून रेशमी हा, सुख गार गार देतो

मनशिंपलीत माझ्या, शिरतो क्षणात पाऊस


हे अर्घ्य सागराचे, वरदान हे प्रभुचे

हा साद नित्य देतो, वसतो नसांत पाऊस


कवी: उमेश कोठीकर


चाल इथे ऐका.

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०१०

अतृप्त!

उमेश कोठीकरची ही स्वप्नाळू कविता वाचली आणि जी चाल सुचली ती ऐका...पाहा आवडतेय का?
(काही निवडक कडवीच घेतलेत चाल लावण्यासाठी)


चंद्र ल्यावा या ललाटी, स्वप्न जे घडलेच नाही
तू सखा बनलाच नाही , मी सखी झालेच नाही

येउनी हलकेच मागे, तू मला बाहूत घ्यावे
मी रूसावे; मी भिजावे, मी असे जगलेच नाही!

रात्रमदीरा ती भिनावी, ही तनू कैफात न्हावी
सूर अपुल्या अंतरीचे, का कधी जुळलेच नाही?

कोरड्या अधरांपरी हा, देह माझा कोरडा का?
प्रणय का उपचार भासे? मी कधी फुललेच नाही

स्वप्न ओथंबून यावे, चिंब हे आयुष्य व्हावे
जे दिवस निसटून गेले, का पुन्हा वळलेच नाही?

रिक्त तू होऊन सखया, का झणी मिटतोस डोळे
गूज नंतरचे सुखावह, रे तुला कळलेच नाही

तू असा अन तू तसा तर, 'मी' कुठे हे शोधिले मी
हृदी तुझ्या गर्दीत मी च्या, 'मी' मला दिसलेच नाही!

कवी:उमेश कोठीकर

रविवार, २६ जुलै, २००९

सागर किनारी...

उमेश कोठीकर हे मायबोली आणि मिसळपाववर नियमित कविता लिहितात. त्यांची ही कविता वाचून मला एक हलकीफुलकी चाल सुचली. ऐकून सांगा कशी वाटली ते.


सागर किनारी..

सागर किनारी
दोघेच असावे
बोलता बोलता
मिठीत शिरावे

मिठीत शिरून
लटके रुसावे
प्रेमाच्या आर्जवी
खुदकन हसावे

खुदकन हसूनी
भुलावे झुलावे
रुपेरी वाळूत
पाउल नाचावे

नाचत हळूच
हात हे गुंफावे
स्पंदन प्रेमाचे
हृदयी ऐकावे

हृदयी ऐकावे
डोळ्यांत बघावे
निळुल्या पाण्यात
डुंबुनी यावे

डुंबता डुंबता
श्वास हे दुणावे
ओठांचे अमृत
ओठांत शिरावे

ओठांत शिरूनी
गुलाबी जगावे
स्वप्नांच्या गर्भाचे
बीज तू व्हावे!

कवी: उमेश कोठीकर

चाल इथे ऐका.