उमेश कोठीकरची ही स्वप्नाळू कविता वाचली आणि जी चाल सुचली ती ऐका...पाहा आवडतेय का?
(काही निवडक कडवीच घेतलेत चाल लावण्यासाठी)
चंद्र ल्यावा या ललाटी, स्वप्न जे घडलेच नाही
तू सखा बनलाच नाही , मी सखी झालेच नाही
येउनी हलकेच मागे, तू मला बाहूत घ्यावे
मी रूसावे; मी भिजावे, मी असे जगलेच नाही!
रात्रमदीरा ती भिनावी, ही तनू कैफात न्हावी
सूर अपुल्या अंतरीचे, का कधी जुळलेच नाही?
कोरड्या अधरांपरी हा, देह माझा कोरडा का?
प्रणय का उपचार भासे? मी कधी फुललेच नाही
स्वप्न ओथंबून यावे, चिंब हे आयुष्य व्हावे
जे दिवस निसटून गेले, का पुन्हा वळलेच नाही?
रिक्त तू होऊन सखया, का झणी मिटतोस डोळे
गूज नंतरचे सुखावह, रे तुला कळलेच नाही
तू असा अन तू तसा तर, 'मी' कुठे हे शोधिले मी
हृदी तुझ्या गर्दीत मी च्या, 'मी' मला दिसलेच नाही!
कवी:उमेश कोठीकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा