रविवार, २१ नोव्हेंबर, २०१०

अभंग!

सुरुचि नाईकने लिहिलेला हा अभंग वाचला आणि क्षणभर असं वाटलं की हा अभंग कुण्या संतांचा आहे की काय? पण नाही..खुद्द तिनेच हा अभंग लिहिलाय...इतकी प्रासादिक रचना पाहून तिला चालही सुचली...तीही अगदी साधी आणि पारंपारिक.


वेढले रे मन गूढ काळोखात
तेजोदीप आत लाभो तुझा

खोल अंतरात कासावीस भान
चरणी तुझ्या ध्यान रुजवी माझे

कोणती वादळे पाहतात वाट
तुझा दे रे हात माझ्या हाती

तुझी माया राहो माझ्या पदरात
तूझ्या स्मरणात जीव माझा

डोळा तुझे रूप,चित्ती तुझे ध्यान
ओठी सदा नाम वसो तुझे

देहाचे गाठोडे,ईप्सीतांचे घडे
अनंताचे कोडे सुटती ऐसे

जाणिला रे संग माझा पांडुरंग
आता रे अभंग अंतरंग

कवयित्री: सुरुचि नाईक

चाल इथे ऐका.

एकटी !

सुरुचि नाईक ही  एक मनस्वी कवयित्री. तिच्या कविता वाचतांनाच जाणवतं की त्यात एक लय आहे.
तिचीच ’एकटी’ ही कविता वाचल्यावर जी चाल सुचली ती ऐका.

मी एकाकी एकटी
सारेच परके मला
माझाच अबोला
करी बोलके मला

मी शून्य माझ्याविना
शून्यातही मीच मी
अस्तित्वाचा शोध माझ्या
शोधातही मीच मी

मी एकटी सुखाविणं सुखी
मी एकटी दु:खाविणं दु:खी
एकटीच मी, असे भाग्य माझे
सुखदु:खे माझ्याविना पोरकी

मी एकटी, विश्व एकटेच माझे
माझ्याच विश्वात माझी गीते
धुंदीत गाते मस्तीत गाणे
माझी माझ्यात मी अशी राहते

कवयित्री: सुरुचि नाईक

इथे चाल ऐका.

शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०१०

विठ्ठल उभा विटेवरी!

पाषाणभेद ह्या टोपण नावाने कविता लिहिणार्‍या सचिन बोरसेचा  हा छानसा  अभंग वाचून मला जी चाल स्फुरली ती ऐका.


विठ्ठल उभा विटेवरी
भक्ताचीये वाट पाही ||धृ||

पुंडलीक दावी भक्तां मार्ग
कर्म करता सुखवी भोग
भोळा भाव नको आव
न भूले बाह्यस्वरूप ||१||

नामजप करता विठ्ठल
अवघे हरपले भान
कोण विठ्ठल कोण भक्त
दोन्ही ब्रह्मस्वरूप ||२||

कवी: पाषाणभेद

चाल इथे ऐका.

नाते ऋणानुबंधाचे.

मुटेसाहेबांचा रानमेवा हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झालाय त्याची संक्षिप्त बातमी खाली वाचा.

रानमेवा’ पुस्तक प्रकाशन

श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव
येथे बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी ‘रानमेवा’ या गंगाधर मुटे लिखित पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध शेतकरी नेते मा. शरद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.

श्रीयुत गंगाधर मुटे ह्यांचे हार्दिक अभिनंदन!

गंगाधर मुटे हे एकापेक्षा एक सरस काव्य रचत आहेत. ही त्यांची कविता नुकत्याच प्रकाशित झालेल्या ’मोगरा फुलला दिवाळी अंक २०१०’ मधील आहे.चाल लावताना सोयीसाठी म्हणून मी फक्त चारच द्विपदी निवडलेल्या आहेत. ही माझी अधिकृतपणे ८० वी रचना आहे.

नाते ऋणानुबंधाचे..!!

ऋणानुबंधाचे...... ते हक्क सांगताना
पुलकित होय अवनी, ओहळ रांगताना...!

का उठती रोमांच? अलगद स्पर्श होता
ते गगनही उल्हसित, मेघ पांगताना ....!

गम्य कसे गवसते? तृष्णा कोण जाणे
शहारते पाकळी, पतंग खेळताना ......!

अस्पर्श रक्षिलेला, जपुन जतन ठेवा
ते हृदयही कंपित, तार छेडतांना ......!

स्पर्श उत्कटतेचे, सख्यास बळ देते
तन्मय ती तनूही, स्वरूप चाळताना...!

फेकुनी दूर अभये, शाल काळोखाची
रजनी लेत लाली, भानू उगवताना...!

कवी: गंगाधर मुटे

चाल इथे ऐका.

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०१०

शाश्वत

क्रान्तिची, तिचं शब्दप्रभुत्त्व दाखवणारी, ही अजून एक सुंदर अशी काव्यरचना. माझ्या चालीतून तिने कवितेत व्यक्त केलेल्या भावना व्यक्त होताहेत का ते सांगा जरा.

खळाळते जलतरंग सुंदर
स्वरलहरींचे मोती उधळत
कणाकणातुन छेडित येती
स्वर्गीचे संगीत अनाहत

दुग्धधवल धारांचे नर्तन,
हिरवे-काळे कातळ उजळत
रुद्रजटेतिल गंगेसम ते
भव्य-दिव्य सौंदर्य अनवरत

हिमकण जैसे तुषार झेलुन
पर्णपाचुचे किरण चकाकत
इंद्रधनूची रंगसंगती
लेवुन वृक्षलताहि सुशोभित

अमोघ अस्त्रापरी कोसळे
तो घनघोर प्रपात अखंडित,
स्तंभित अन नि:शब्द उभी मी,
अशाश्वतातिल शाश्वत शोधत!

कवयित्री: क्रान्ति साडेकर

चाल इथे ऐका.

शनिवार, ६ नोव्हेंबर, २०१०

आज दिवाळी आली !

जयश्री अंबासकरने लिहिलेले हे नवे दिवाळीवरील काव्य वाचलं आणि जी चाल स्फुरली ती इथे देत आहे...जरूर ऐका.

सोमवार, १ नोव्हेंबर, २०१०

पहिले चुंबन!

उल्हास भिडे ह्यांची ही कविता वाचल्यावर जी चाल सुचली ती आपल्यासमोर ठेवत आहे.