रविवार, १९ डिसेंबर, २०१०

ओढ

उमेश कोठीकरची ही निसर्गरम्य कविता वाचली आणि ही चाल सुचली.


धारित्रीच्या स्वयंवराला, मेघ बरसती असे निरंतर
या मातीतून मोती येतील, हा सृष्टीचा कुठला मंतर?

मेघपंख हे निळे लावूनी, या वार्‍याचे गीत गाऊनी
बरसून जाऊ पंखांसमवे, विहरत आपण असे दिगंतर

आठवणींचे श्वास असू दे, निकट तुझा आभास असू दे
मिटवून टाकू थरथरणार्‍या, श्वासांचे हे उत्कट अंतर

मृदगंधाला अंगी भिनू दे, हिरवे हिरवे हृदय होऊ दे
या हृदयातील प्रेमफुले ही, डोलत ठेवू अशी अधांतर

श्रावणात या चिंब न्हाऊनी, ऋतु सावळा मनी लेवूनी
ओढ रेशमी गर्दगुलाबी, दो हृदयांना जशी समांतर

या मातीची आस असू दे, येऊ परत विश्वास असू दे
कालचक्र हे विसरून जाऊ, मिठी असू दे युगे निरंतर

मनामनाच्या उजळून वाती, सजवू गहिर्‍या श्रावणराती
काय चूक अन काय बरोबर, ठरवू बाकी आपण नंतर!

कवी: उमेश कोठीकर

त्रितालात गायलेली चाल इथे ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: