सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०११

जगणे

जगण्याचा हा अपुला हेतू
पोटासाठी फक्त भाकरी
दडवून स्वप्ने खिशात; धरतो
संसाराची बरी चाकरी

अतृप्तीतून तृप्ती शोधत
उगा मधाचे बोट लावतो
दो मिनिटांच्या शृंगारातून
मला वाटते देव पावतो

चौकटीतल्या पोकळीत मी
उगीच जगतो, उगीच मरतो
अमृत सोडून आयुष्यातील
हलाहलाचा हिशेब करतो

कवी: उमेश कोठीकर

इथे चाल ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: