सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

शुक्रवार, १० डिसेंबर, २०१०

पाऊस!

उमेश कोठीकरच्या ह्या कवितेतला पाऊस पाहून मलाही बरसावंसं वाटलं. ;)
ह्या कवितेला सुचलेली चाल ऐकून सांगा ,कितपत आवडली ते.


भेगाळ या धरेच्या, शिरतो तनात पाऊस

मृदगंध भिनवितो, हसतो फुलांत पाऊस


हिरवाच ढंग सगळा, हिरवी वसुंधरा ही

हिरवेच कोंब येती, हिरव्या दिशांत पाऊस


का आस ही फिटेना, का चिंब मी भिजेना?

ही भूक जागवितो, कसली तनात पाऊस?


हा मोर का विभोर, अतृप्त का चकोर?

हे थेंब आठवांचे, स्त्रवतो मनात पाऊस


भिजवून यौवनाला, कटी चिंब हा अकार

जणू थाप ही मृदंगी, देतो दिलात पाऊस


बरसून रेशमी हा, सुख गार गार देतो

मनशिंपलीत माझ्या, शिरतो क्षणात पाऊस


हे अर्घ्य सागराचे, वरदान हे प्रभुचे

हा साद नित्य देतो, वसतो नसांत पाऊस


कवी: उमेश कोठीकर


चाल इथे ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: