शनिवार, १२ फेब्रुवारी, २०११

मराठी!

नररत्नांची खाण मराठी
सदैव उन्नत मान मराठी
अजिंक्य आहे आणि राहील
भारतभूची 'जान' मराठी

पक्ष्यांची ही साद मराठी
कडे कपारी, नाद मराठी
'हर हर हर' डरकाळी फुटते
विजयाचा अस्वाद मराठी

लाजलाजिरी रात मराठी
महाराष्ट्राची बात मराठी
गवतांनाही भाले फुटती
त्या हिरव्या कोंबात मराठी

या मातीचा श्वास मराठी
या दर्याचा न्यास मराठी
या व्योमाच्या अणुरेणूतून
वसते अमुची खास मराठी

या दुर्गांची माळ मराठी
कधी न तुटते नाळ मराठी
वरून कणखर, आतून हळवे
हृदयामधले बाळ मराठी

धरतीच्या उदरात मराठी
कधी न सोडी साथ मराठी
या देशातून प्रेम वाहते
या देशाची जात मराठी

कवी:उमेश कोठीकर

ही कविता वाचून मला सुचलेली चाल ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: