श्यामली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
श्यामली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २८ जुलै, २०११

जपमाळ

बा भगवंता तुला, सांग किती मी स्मरावे
कसे कितीक द्यावे मी, आणखी पुरावे।
नाम जपावे जपावे, मन जपमाळ व्हावे
का पावशी न देवा तुझेच तुजला ठावे॥

कवयित्री: कामिनी केंभावी(श्यामली)
ह्या चारोळीला मला सुचलेली चाल ऐका.

शनिवार, ११ जून, २०११

का पुन्हा पुन्हा!

का पुन्हा पुन्हा हा जीव तिथे घुटमळतो?
जणू प्राण पुन्हा हा शब्दातुन दरवळतो
या शब्दांचे हे अजब लाघवी नाते
हातास धरूनी मज समेस घेऊन येते

कामिनीने लिहिलेली ही चारोळी वाचली आणि एक चाल सुचली...ती खाली ऐका.



कवयित्री:कामिनी केंभावी(श्यामली)

मंगळवार, २९ सप्टेंबर, २००९

मन!

श्यामलीची ही एक साधी,सोपी रचना....मन! लोकगीताच्या अंगाने जाणारी हिची चाल कशी वाटतेय...ऐकून सांगा.

मन!
मन एक सान पक्षी
मन रानभर नक्षी
मन पिसारा पिसारा
मन मोठाच पसारा

मन भीती मन प्रिती
मन भुणभूण किती
मन आठवे साठवे
पुन्हा जुनेच नव्याने

मन कैरीची गं फोड
नाही कसलीच तोड
मन साजण साजण
गाली चढते तोरण

मन माय मन तात
मन सखीचा गं हात
मन जखम जखम
मन घालते फुंकर

मन भास मन त्रास
लक्ख उजेडाची आस
मन चकव्याचे फूल
पुन्हा पुन्हा देई हूल

कवयित्री:श्यामली

चाल ऐका.

सोमवार, २४ ऑगस्ट, २००९

गणराज !

रे घना !

श्यामलीची ही अजून एक सहजसुंदर रचना. वाचताच चाल लावाविशी वाटली. ह्यातले ’रे घना,सांग ना’ हे शब्द खूप काही सांगून जातात. ऐकून पाहा चाल आवडतेय का ते.

रे घना

अंथरून जीव हा वाट पाहते धरा
येथ मेघ येत ना; आर्त साद अंबरा

मार्गही तोच अन नेमही असे जुना
काय येथे तुला यायचे ना पुन्हा?

रे घना सांग ना काय झाले असे?
कोण ते भेटले तुला नवे कधी कसे?

ऐक ना तुझ्याविना सर्व येथे सुने;
पाखरे न बोलती राहती उगा घुमे

भांडणास आपुल्या सोड ना अता जरा
अंथरून जीव हा वाट पाहते धरा...

कवयित्री:श्यामली



रविवार, ५ एप्रिल, २००९

थांबलो आहे.

कामिनी केंभावी ही देखिल अशीच एक मनस्वी कवयित्री आहे. मायबोली आणि मनोगत ह्या संकेतस्थळांवर ती नियमितपणे लेखन करत असते. श्यामली ह्या टोपण नावाने ती लेखन करते.
"थांबलो आहे" ह्या मला आवडलेल्या तिच्या गजलेला मी चाल बांधलेय(नेहमीप्रमाणे निवडक शेर घेतलेत)..कशी वाटतेय ते सांगा.