रविवार, १७ मे, २००९

गणेशवंदना!

’क्रान्ति’ने रचलेली ही गणेशवंदना पाहा. मुळात तिने हे मालकंस राग डोक्यात ठेवून लिहीलेय. त्याप्रमाणे मी ह्या गीताला मालकंसात चाल बांधलेय(त्यात काय विशेष म्हणा) आणि त्याच वेळी ही रचना मला भूप रागातही करावीशी वाटली. तेव्हा ऐका दोन्ही रचना.

गणेशवंदना!

सकल कलांचा उद्गाता
गुणेश गजानन भाग्यविधाता ||धृ||
प्रथम पूज्य हा शिवगौरीसुत
गणनायक शुभदायक दैवत
या विश्वाचा त्राता विनायक या विश्वाचा त्राता ||१||
आदिदेव ओंकार शुभंकर
मी नतमस्तक या चरणांवर
तू विद्येचा दाता गजमुखा तू विद्येचा दाता ||२||

क्रान्ति

दोन्ही चाली इथे ऐका.

१)भूप रागातली.
गायन आणि पेटीची साथ: केदार पवनगडकर
तबला: सुहास कबरे




२) मालकंसातील
ही मीच गायलेय....

मंगळवार, १२ मे, २००९

गान समाधी

नागपुरचे तुषार जोशी हे देखिल एक अष्टपैलू व्यक्तीमत्व आहे. लेखक/कवी म्हणून त्यांनी भरपूर लेखन केलेय. त्यांची ’गान समाधी’ ही कविता वाचताच लगेच चाल लावाविशी वाटली. आधी मी भैरवीत चाल लावली होती पण का कुणास ठाऊक ह्या कविततेल्या आशयाला ती पूरक वाटली नाही म्हणून मग मी ही दुसरी चाल लावली. ऐकून सांगा कशी वाटतेय ती?

गान समाधी

आलाप असा की नव चैतन्य जागे
तृप्त मनाने गान समाधी लागे

एकेक सूर उजळतो आयुष्याला
आनंद सुरांच्या धावे मागे मागे

मज कुणी नको साथ कराया आता
माझे जगणे तर फक्त सुरांनी भागे

आयुष्याचा रत्न जडित हा शेला
विणतो मी घेऊन सुरांचे धागे

तुषार जोशी, नागपूर

इथे चाल ऐका.

ती संपली कहाणी !

जयंता५२ ह्या नावाने गजल/कविता लिहीणारे जयंतराव कुलकर्णी हे नियमितपणे मनोगत ह्या संकेतस्थळावर आपले लेखन करतात.त्यांची ’ती संपली कहाणी’ही गजल वाचली आणि चाल लावण्याची उर्मी आली. अतिशय कमी शब्दात नेमका आशय मांडणारी ही गजल छोट्या बहरमधील असल्यामुळे हिची चाल पारंपारिक गजलेच्या अंगाने जात नाहीये.

ती संपली कहाणी

ती संपली कहाणी
आता नको उजळणी

घडले नवे न काही
अन् कारणे पुराणी

माझ्या सवेच झाली
ही आसवे शहाणी

मी शीळ घालतो, ती
का भासते विराणी?

राजा नसेन मी, पण
गोष्टीत तूच राणी!.


कवी: जयन्ता५२

रूपक तालात गायलेली  चाल इथे ऐका.

गुरुवार, २३ एप्रिल, २००९

सावली!

राघवची ही अजून एक सहजसुंदर रचना. वाचता वाचताच चाल सुचली.

सावली

भारलेली रात्र सारी चंद्र आहे संगती,
गारवेला गार वारा वाहतो सभोवती,
पारिजाता पालवीची आस आहे लागली
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

चांदणे पाण्यात बघता भास होई अंतरी,
गूज काही सांगण्यासी नभ उतरले भू वरी,
हलकेच काही बोलणारी रात्र कैसी रंगली,
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

गाज येई सागराची धुंदल्या तालावरी,
बोल सारे रेखणारी लाट होई बावरी,
त्या किनार्‍याच्या शिवारी प्रेमवीणा गूंजली,
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

कवी:राघव
चाल इथे ऐका.

रविवार, १९ एप्रिल, २००९

माझा वसंत!

क्रान्तिची ही अजून एक सुंदर रचना मला आवडली आणि मी ही चाल लावली. मराठीत गाजलेल्या एखाद्या गाण्यासारखीच वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ;) कारण चाल आपोआप उलगडत गेली. मुद्दामून वेगळी चाल लावावी असे नाही वाटले.

माझा वसंत

ग्रीष्मातल्या उन्हाची काही न खंत आता
आला फिरून आहे माझा वसंत आता

आताच मी मनाला समजावले जरासे
दु:खातुनी मिळाली थोडी उसंत आता

वारा फिरे भरारा माझीच गात गाणी
माझी कथा जगाला सांगे दिगंत आता

केव्हातरी सुरांशी जुळतील शब्द माझे
या कल्पनेत जगणे आहे पसंत आता

दाही दिशा उभ्या या उघडून सर्व दारे,
माझ्या मुशाफिरीला वाटा अनंत आता

कवयित्री:क्रान्ति
चाल इथे ऐका.


शुक्रवार, १७ एप्रिल, २००९

चित्कला!

वारसे.

’वारसे’ ही मिलिंद फणसे ह्यांची अजून एक सशक्त गजल. गजल वाचताच चाल लावाविशी वाटली.

वारसे

गाव हा नाही तुझा, ना तुझी ही माणसे
सोड सारे, जा पुढे, पूस जाताना ठसे

कैकदा हृदयाहुनी भिंत ओली पाहिली
मी मनांचे पाहिले उंबरे बेजारसे

सावली शोधावया वृक्ष वणवणती इथे
अन् स्वतःला पाडण्या बिंब शोधी आरसे

जाहले आशीषही वास्तुपुरुषाचे मुके
सोयर्‍यांचे चेहरे कोरडे; मौनी घसे

वडिलधार्‍या सावल्या दे मला माध्याह्निला
ना तरी दे घन तमी वाट-चुकले कवडसे

पावसाचे आगमन दूर नाही फारसे
चेहर्‍यावर काजळी, नेत्रही गर्भारसे

विहर तू बागेत पण विहर चिलखत घालुनी
भृंग, बाणांचे इथे फूल सांगे वारसे

कवी: मिलिंद फणसे
इथे चाल ऐका.