शुक्रवार, १७ एप्रिल, २००९

वारसे.

’वारसे’ ही मिलिंद फणसे ह्यांची अजून एक सशक्त गजल. गजल वाचताच चाल लावाविशी वाटली.

वारसे

गाव हा नाही तुझा, ना तुझी ही माणसे
सोड सारे, जा पुढे, पूस जाताना ठसे

कैकदा हृदयाहुनी भिंत ओली पाहिली
मी मनांचे पाहिले उंबरे बेजारसे

सावली शोधावया वृक्ष वणवणती इथे
अन् स्वतःला पाडण्या बिंब शोधी आरसे

जाहले आशीषही वास्तुपुरुषाचे मुके
सोयर्‍यांचे चेहरे कोरडे; मौनी घसे

वडिलधार्‍या सावल्या दे मला माध्याह्निला
ना तरी दे घन तमी वाट-चुकले कवडसे

पावसाचे आगमन दूर नाही फारसे
चेहर्‍यावर काजळी, नेत्रही गर्भारसे

विहर तू बागेत पण विहर चिलखत घालुनी
भृंग, बाणांचे इथे फूल सांगे वारसे

कवी: मिलिंद फणसे
इथे चाल ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: