सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २००९

नको फिरून बोलणे.

सोनाली जोशी उर्फ सुवर्णमयीची ही एक मस्त गजल वाचल्यावर साहजिकच तिला चाल लावाविशी वाटली.मूळ गजलेत एकूण ६ द्विपदी आहेत. मी फक्त पहिल्या चारांचाच ह्यात समावेश केलाय. ऐकून सांगता का कशी वाटली चाल?

नको फिरून बोलणे


नको फिरून बोलणे नकोच आज भेटणे
नकोच तेच लाजणे नकोच दूर सारणे

इथे तुझ्याविना झुरून गप्प राहती फुले
लुटून गंध ने जरा.... हवे तुझे दुखावणे

तनामनात आजही तुझाच श्वास राहतो
फिरून आठवे मला तुझेच छेड काढणे

जशा सरी अधीरती बघून उष्ण ही धरा
तुला कधी जमेल का नभासमान भेटणे

किती बघायची तुझी इथे खुलून वाट मी?
वरून आठवायचे तुझे मधाळ बोलणे

निघू म्हणून अंगणात थांबतोस तू जरा
सुरूच राहते युगात त्या क्षणास गुंफणे

कवयित्री:सुवर्णमयी

चाल इथे ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: