प्राजुची ही अजून एक वेगळी कविता. सर्वसाधारणपणे कवि-कवयित्रिंना पौर्णिमेचे आकर्षण असतं. पण प्राजुने त्या समजुतीला छेद देत चक्क अमावस्येवर कविता केलेय. ती वाचा इथे आणि चालही ऐका.
अमावस्या!
काळोख भयाण किरकिर रानात
रंगला आगळा खेळ
चंद्राला शोधून चांदण्या थकल्या
आलीया आवसेची वेळ
सळसळ दाटली झाडांच्या पानांत
वाराही बेभान झाला
घुमघुमं घुमघुमं कडेकपारीत
गारवा भरून गेला
चुरचुरं पाऊल रानांत चाहूल
रातीचा नूर हा न्यारा
भिरभिरं पाकोळी होऊन गोंधळी
काळोख जागवी सारा
चमचमं चमचमं चुकार काजवा
क्षणिक ठिगळ लावी
लखलख प्रकाश रेखूनी उगाच
रातीला भय तो दावी
फ़ुंकूनी तांबडं क्षितिज रंगलं
पहाट मंगल झाली
दिसेल चांदवा आजच्या रातीला
अवनी निवांत झाली
कवयित्री:प्राजु
चाल इथे ऐका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा