मंगळवार, २९ सप्टेंबर, २००९

मन!

श्यामलीची ही एक साधी,सोपी रचना....मन! लोकगीताच्या अंगाने जाणारी हिची चाल कशी वाटतेय...ऐकून सांगा.

मन!
मन एक सान पक्षी
मन रानभर नक्षी
मन पिसारा पिसारा
मन मोठाच पसारा

मन भीती मन प्रिती
मन भुणभूण किती
मन आठवे साठवे
पुन्हा जुनेच नव्याने

मन कैरीची गं फोड
नाही कसलीच तोड
मन साजण साजण
गाली चढते तोरण

मन माय मन तात
मन सखीचा गं हात
मन जखम जखम
मन घालते फुंकर

मन भास मन त्रास
लक्ख उजेडाची आस
मन चकव्याचे फूल
पुन्हा पुन्हा देई हूल

कवयित्री:श्यामली

चाल ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: