सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

रविवार, ५ एप्रिल, २००९

सांज-राधा!

क्रान्तिची ही अजून एक आशयघन आणि कृष्णमय अशी कविता.मी रचलेली ही चाल कशी वाटतेय पाहा बघू.


सांज-राधा

त्या सांजकोवळ्या उन्हात सजल्या वाटा
गुणगुणती गीते तुझी निरागस लाटा

मावळतीवरती रंग नवे क्षितिजाचे
पाऊल वाजते हलके बकुळफुलांचे

माडांच्या छाया झुलती वार्‍यासंगे
जणु कृष्णसख्याचा रास आगळा रंगे

आसमंत भारित सूर मुरलीचे आले
कालिंदीचे जल थबके, कदम्ब डोले

तो मऊ मुलायम स्पर्श मयुरपंखांचा
दरवळतो हलका भास मधुर गंधाचा

या चराचराला जडली त्याची बाधा
श्रीरंग घन निळा, सांज सोनुली राधा

कवयित्री: क्रान्ति


ही चाल ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: