रविवार, ५ एप्रिल, २००९

मधुराभक्ती!

क्रान्तिची ही अजून एक सुंदर आणि भावपूर्ण कविता.कविता वाचता वाचताच चाल साकारत गेली.


मधुराभक्ती

मज ध्यास दर्शनाचा रे, ना कसलीही आसक्ती
अंतरात माझ्या वसते, मीरेची मधुराभक्ती

मी गीत तुझे गुणगुणते
चैतन्य जणू रुणझुणते
गीतातून माझ्या करते तव प्रीतीची अभिव्यक्ती

तन राही जरी संसारी
मन घेते गगनभरारी
एकाच ठायी अनुभवते आसक्ती आणि विरक्ती

काळोख मनाला ग्रासे
हा जन्मही शापच भासे
तुजवाचून जगण्याचीही उरली ना इच्छाशक्ती

सर्वस्व तुला अर्पावे
आयुष्य इथे संपावे
तुजसाठी पुन्हा उमलाया, या जन्मि मिळावी मुक्ती
कवयित्री: क्रान्ति

खालील विजेटवर चाल ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: