रविवार, ५ एप्रिल, २००९

भूल!

जयश्रीची ही अशीच एक भावपूर्ण कविता वाचा. ह्या कवितेला मी जरा उडती चाल लावलेय. कितपत जमलेय सांगा बरं.

भूल

भूल पडली सागराची चंद्रवर्खी रातीला
बंधने उधळून सारी ती निघाली भेटीला

चांदण्याचे माप ओलांडून अलगद उतरली
बावरी नव परिणिता जणु प्रियकराला बिलगली

सावळ्या सखी-साजणाचा नूर होता आगळा
मत्स्यगंधा रात्र झाली, अन्‌ धुके चहूबाजुला

यामिनीचा मग रुपेरी साज हलके उतरला
धुंदले आकाश होते चंद्र होता साक्षीला

शांत झाली गाज तरीही गोड हुरहुर राहिली
का निशेची पैंजणे लाटात त्या रेंगाळली

रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले
अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले

कवयित्री: जयश्री अंबासकर

चाल ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: