सोमवार, ५ सप्टेंबर, २०११

तुंदिलतनु श्री गणेश!

एकदंत, वक्रतुंड रूप गोड गोजिरे
तुंदिलतनू श्रीगणेश नृत्य करी साजिरे || धृ ||

ताल देतसे समीर, रुणझुणती घाग-या
चंचल चपला उतरे पावलांत नाच-या
सोनसाखळ्या चरणी, त्यांत जडविले हिरे
तुंदिलतनू श्रीगणेश नृत्य करी साजिरे || १ ||

मनमोहक हावभाव, मूक तरी बोलके
माय - तात गौरी-शिव पाहतात कौतुके
गिरकी घेता गणेश, सकल विश्वही फिरे
तुंदिलतनू श्रीगणेश नृत्य करी साजिरे || २ ||

सूर्य-चंद्र, गगन-धरा, गिरि-सागर दंगले
तीन लोक नृत्याच्या मोहिनीत रंगले
दिन-रजनी विसरुनिया काळ नर्तनी विरे
तुंदिलतनू श्रीगणेश नृत्य करी साजिरे || ३ ||

कवयित्री: क्रांति साडेकर
चाल : प्रमोद देव
गायन : श्री केदार पावनगडकर
हार्मोनिअम : श्री केदार पावनगडकर
तबलासाथ : श्री सुहास कबरे

केदार पावनगडकरांसारखा उत्तम गायक, आणि कबरेसाहेबांसारखा प्रख्यात तबलजी लाभला आणि माझ्या चालीचे सोने झाले.
इथे चाल ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: