सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

गुरुवार, ९ डिसेंबर, २०१०

अंतराळ !

क्रांतीची अजून एक सुंदर आणि तरल अशी ही कविता वाचली आणि चाल सुचली ती अशी....

अंतराळ हा तुझाच, पंख तुला स्वप्नांचे

चंद्रबिंब प्रतिभेचे, तारांगण शब्दांचे ॥


या विशाल अंबरात उंच उंच विहरत जा,

साद देतसे दुरून आमंत्रण पक्षांचे ॥


वाजते दिशांमधून मंद धून वार्‍याची,

इंद्रधनू गुणगुणते भावगीत रंगांचे ॥


संथ या जलाशयात नाव बुडे किरणांची,

भांडारच जणु लुटले कुणि सुंदर रत्नांचे ॥


पंखांवर नभ तोलुन मानस वाचत फिरते,

बंधमुक्त पाखरू तुझ्या ऋणानुबंधांचे ॥


मनकवड्या पाखरास गुपित मुळी सांगु नको,

अवघ्या काही क्षणांत होइल ते विश्वाचे ॥

कवयित्री: क्रान्ति साडेकर

चाल इथे ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: