सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

गुरुवार, ९ डिसेंबर, २०१०

सिंदूर !

मिलिंद फणसेंची ही अर्थवाही गजल वाचताच जी चाल स्फुरली ती ही अशी...


नि:शब्द होत गेलो, कणसूर होत गेलो
तेव्हा कुठे जगाला मंजूर होत गेलो

ठिणग्या विझून गेल्या, जमले न पेट घेणे
केवळ जरा धुमसलो अन्‌ धूर होत गेलो

धारा न अमृताच्या वळल्या फिरून मागे
जो ओसरून गेला तो पूर होत गेलो

झाल्यात पोसलेल्या जळवा कशा टपोर्‍या
माझीच चूक आहे, मी ऊर होत गेलो

स्मरणातुनी जगाने पुसले असे मला की
वैधव्यग्रस्त भाळी सिंदूर होत गेलो

कवी: मिलिंद फणसे

चाल इथे ऐका.

1 टिप्पणी:

मिलिंद / Milind म्हणाले...

धन्यवाद,प्रमोदराव.