राजेश घासकडवी ह्यांची ही तरल भावना व्यक्त करणारी कविता वाचा....कविता वाचता वाचताच तिची चालही अलगदपणे उलगडत गेली. कशी ते ऐका......
उजव्या बाजुस गजबजणारी तीच गाज घुमते अरबी
हा तोच किनारा फिरतो मी ।।धृ।।
दगडावरती झोकुन सारे
वार्यामनिचे गुपित खारे
लेउन लाटा उधळण करती तीच तुषारांची धुंदी ।।१।।
तोच दिवस त्या महिन्याचाही
तोच कोन त्या किरणांचाही
परंतु पृथ्वी सूर्याभवती व्यर्थ फेर फिरली काही ।।२।।
धरून ऐना कुंद हवेला
तनामनाने हिरवुन गेला
तसा न सागर आज सांगतो जन्मजन्मीच्या गुजगोष्टी ।।३।।
केसांमधल्या लाटा सारत
शब्दहासरे तुषार बरसत
उजव्या बाजुस गाज रोखुनि चालत तू ना मजसाथी ।।४।।
काय बोललो तेव्हा आपण
कसे कुठे अन गेले ते क्षण
मनात ओल्या रेतीवरच्या त्याच खुणा धरल्या जपुनी ।।५।।
डाव्या बाजुस गाज अता ही
सूर्यास्ताची सरते तरिही
जादू उरली अजुनी अपुल्या स्पर्शधुंदीच्या लाटांची ।।६।।
कवी: राजेश घासकडवी
चाल इथे ऐका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा