सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१०

मुक्त!

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानातील कारावासात तिथल्या भिंतीवर ’कमला’ नावाचे खंडकाव्य लिहिले. ते लिहिण्यासाठी त्यांना कागद-पेन/पेन्सिल मिळाले नाही...म्हणून त्यांनी ते भिंतीवर लिहिले असा इतिहास आहे. ह्या कवितेत लोककवी मनमोहन नातू ह्यांनी त्यामागची कल्पना मांडलेली आहे. ती आपण इथे जास्त विस्तृतपणे वाचू शकाल.
ही कविता वाचली आणि जी चाल सहजपणाने सुचली ती इथे आपल्याला ऐकता येईल.


मी मुक्तांमधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी|
माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी ||१||

माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी|
माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी ||२||

जड लंगर तुझिया पायी, तू पीस कसा होणार?
माझ्याहुनि आहे योग्य, भूमीला प्रश्न विचार ||३||

आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही|
मग विनायकाने त्यांची आळवणीही केली नाही ||४||

पापण्यात जळाली लंका, लाह्यांपरी आसू झाले|
उच्चारुन होण्याआधी उच्चाटन शब्दां आले ||५||

की जन्म घेण्यासाठी गंगेस हिमालय नाही|
शाई न वाळली अजुनी परि अभंग नदीच्या बाही ||६||

दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली|
मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली ||७

-- लोककवी मनमोहन नातू.

इथे चाल ऐका.

४ टिप्पण्या:

शंतनू देव म्हणाले...

Wah Farach sundar
Far awadli mala kavita + chaal

-Shantanu
http://maplechipaane.blogspot.com

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद शंतनू.

Viraj Naik म्हणाले...

॥ हरि ॐ ॥
यातील सहावे कडवे हे -

की जन्म घ्यायच्या वेळी गंगेस हिमालय नाही
शाई न-स्पर्शली तरीही हे अभंग नदीच्या बाही ... (६)

असेच आहे ... या सोबतच एका अपूर्ण कडव्याची ओळ आहे जी शालेय पुस्तकात कंसात दिलेली होती ती अशी :

"ती पहाट लालम लाल अनपेक्षित झाली काळी"

अत्त्यानंद उर्फ प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद विराज! आता त्या ओळीत बदल करून त्याप्रमाणे गायनातही बदल करावा लागेल..तो जरूर करतो..सवडीने.