सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

शनिवार, २५ जुलै, २००९

ऋतू न्याराच !

जयंता५२ म्हणजेच जयंतराव कुलकर्णींची ही अजून एक सशक्त गजल.मूळ गजलेत ६ शेर आहेत पण मी चाल लावण्यासाठी पहिले चारच वापरलेत. ह्या गजलेला लावलेली चाल कशी वाटतेय ते ऐकून पाहा.

ऋतू न्याराच

ऋतू न्याराच ह्या नगरात आहे
इथे तर पानगळ बहरात आहे

म्हणे ते सूर साती वर्ज्य ह्याला
कसा हा राग ह्या प्रहरात आहे?

अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच ह्या जहरात आहे

उगा ना मागती ते घास अर्धा
युगांची भूक 'त्या' उदरात आहे

निभावा आजचा हा दिन कसाही
विनवणी हीच ह्या अधरात आहे

विना संचारबंदी सुन्न रस्ते
कुणाचे राज्य ह्या शहरात आहे?

कवी:जयंता५२

इथे चाल ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: