शनिवार, २५ जुलै, २००९

रिमझिम येता वळवाची सर---

मिसळपाव ह्या संकेतस्थळावर नियमित कविता लिहिणार्‍यांपैकी एक आहे पुष्कराज. त्याची ’रिमझिम येता वळवाची सर’ ही कविता वाचली आणि एकदम आवडून गेली. वाचता वाचता चालही उलगडत गेली. तीच इथे चढवलेय. बघा आवडते का ते?

रिमझिम येता वळवाची सर---

रिमझिम येता वळवाची सर
मातीतून मग तुझाच दरवळ
पानोपानी तूच खेळ्सी
ह्र्दय छेडते पुन्हा तुझे स्वर
रिमझिम येता वळवाची सर

स्वरांतूनी तू उमलुनी येसी
माझी होउन मिसळूनी जासी
विहारुनी त्या स्वरांतून मी
सहजच येतो पुन्हा समेवर
रिमझिम येता वळवाची सर

चेहर्‍यावर तव अवखळ गोडी
चंचलता ती यौवन वेडी
अधीर उत्कट फुलूनी येती
मोती अगणित तव अधरावर
रिमझिम येता वळवाची सर

सहज मोती ते टिपूनी घ्यावे
अपूर्ण काही राहून जावे
अन् वळवाचे वेड धरावे
स्वर्गातुन मग यावे भूवर
रिमझिम येता वळवाची सर

कवी:पुष्कराज

चाल इथे ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: