सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

मंगळवार, २८ जुलै, २००९

बेरंग !

महाजालावरचे अजून एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे श्री. नरेंद्र गोळे.....व्यवसायाने विद्युत अभियंता असणारे गोळेसाहेब साहित्य,संगीत इत्यादि कलांमध्येही तितकीच रुची बाळगून आहेत. प्रवासवर्णनं,कविता,भाषांतर,योग आणि आरोग्य अशा विविध प्रांतात ते सहजपणाने मुशाफिरी करतात.
त्यांनी लिहिलेली ही चारोळी वाचली आणि छान वाटली.म्हणून चाल लावण्याचा प्रयत्न केला. आधी बराच वेळ काहीच जमत नव्हते पण जसजशी चारोळी अधिक वेळा वाचत गेलो तशी चालही सुचत गेली. ऐकून पाहा आणि सांगा कशी वाटली चाल?

बेरंग

विहरलो वार्‍यापरी मी कधीचा, तरी मी मुळी अनिरुद्ध नाही ।
लाभला मज कुणाचा संग नाही, तरी मी मुळी निस्संग नाही ।।
रचनेस माझ्या कोणताही बंध नाही, तरी तीही अनिर्बंध नाही ।
मी न गहिरे रंग भरले तरीही, चित्र माझे एकही बेरंग नाही ॥

कवी:नरेंद्र गोळे

इथे चाल ऐका.

1 टिप्पणी:

नरेंद्र गोळे म्हणाले...

ह्या कवितेची पार्श्वभूमी मला आठवते. त्यावेळी मनोगतावर वृत्तबद्ध कविता आणि मुक्तछंद कविता ह्यांच्या पुरस्कर्त्यांत जाम हाणामारी सुरू होती. वृत्तबद्ध कवितांचे मोठेपण कुणी वेगळ्याने सांगायची तर आवश्यकताच नाही. मात्र पोत्यानिशी रोज ओतल्या जाणार्‍या मुक्तछंद कवितांनी त्या काळी जो वात आणला होता, त्यामुळे सगळ्यांना मुक्तछंद कविता नकोशा वाटू लागल्या.

कवितेला बंधन नको हा मुद्दा पटवतांना मग मी बाबा आमटेंच्या कवितेचा दाखलाही दिला. अखेरीस मग मी ही कविता लिहिली.

पुढे कुणीतरी ती विकिपेडियावरही टाकली होती, पण कुसुमाग्रजांच्या नावाने.

आता सुरेख चाल देतांना तुम्ही नाव माझेच ठेवले आहेत हाही आनंद आहेच! चाल आवडली.