सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

शुक्रवार, २४ जुलै, २००९

आज मिलन होणार गं...

बर्‍याच दिवसांनी दीपिका जोशी ह्यांची ही सहजसुंदर कविता वाचनात आली आणि लगेच एक चाल सुचली.
ऐकून सांगा, कशी वाटतेय?

आज मिलन होणार गं...


मनमोर नाचणार गं..
आज मिलन होणार गं..

निशिगंध फुलोरा दरवळतो
गुंजनात भ्रमर सैरभैरतो
मोहरली धरती, आसमंत हसणार गं
आज मिलन होणार गं

चढणार साज ह्या सुरांना
नाद पाउलीच्या पैंजणांना
स्वर भारलेले, एक तान छेडणार गं
आज मिलन होणार गं...

कळ्या नाजूक समयीच्या
खुणवणार बटा भाळीच्या
अंग अंग वसंती आज मी फुलणार गं
आज मिलन होणार गं

कवयित्री: दीपिका जोशी
२ टिप्पण्या:

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

काका खूपच मस्तं वाटलं हो ऐकून....नवीन साज चढला माझ्या कवितेला...झक्कास... चाल लावावीशी वाटावी इथपर्यंत माझी कविता होती तर...
खूप खूप धन्यवाद...

दीपिका जोशी

मी अत्त्यानंद म्हणाले...

चाल आवडली तुम्हाला,भरून पावलो.
धन्यवाद!