क्रान्तिची अजून एक कविता तिच्या नेहमीच्या लौकिकाला साजेल अशी आशयपूर्ण आहे.
अंत
फुलत्या क्षणी फुलणे ना जमले
सुकताना ही खंत नको
गंधित होउन बहरुन जावे,
पाचोळ्यापरी अंत नको
जगणे अवघड झाले तेव्हा
दिला सुरांनी जन्म नवा
जन्मांतरी हे सूर भिनावे,
नुसता कोकिळकंठ नको
रंग-रूप, रस-गंध साठवित
फुलाफुलावर लहरत जावे
फूलपाखरू जीवन व्हावे,
कोशातिल सुरवंट नको
क्षणाक्षणाला कणाकणातुन
उसळावे चैतन्य अनोखे
खळाळते आयुष्य असावे,
गती कधीही संथ नको
अद्भुत काही असे घडावे
असणे-नसणे सार्थ ठरावे
रडतच आलो, रडवून गेलो
इतका साधा अंत नको
कवयित्री: क्रान्ति
चाल इथे ऐका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा