रविवार, ५ एप्रिल, २००९

रिता गाभारा .....

मनीषा ही मिसळपाव ह्या संकेतस्थळावर नियमितपणे लेखन/कविता करत असते. "रिता गाभारा ....." ही तिची कविता वाचताक्षणी तिला चाल लावावीशी वाटली असे म्हणण्यापेक्षा ती चाल त्या कवितेतूनच आपोआप साकार होत गेली. मी केवळ निमित्तमात्र उरलो.

रिता गाभारा .....

देहात माझीया हा
चंद्र वितळून गेला ।
अन अंतरी मोगराही
सुगंध मिसळून गेला ।

झुकवुनी लाख पाहिले
नजरेस मी माझीया ।
तीर तुझ्या नजरेचा
काळजास वेधून गेला ।

बेरंगी दुनियेचा ना
कायदा मी मोडला ।
इशाराच एक तुझा
मज हाय रंगवून गेला ।

वेचियेली मी दुःखेही
माझ्या दोहो करांनी।
फासा दुर्दैवाचा मज
दान देऊन गेला ।

ओळखले नसे कधीही
माझ्याच मी जगाला ।
सौख्याचा क्षण मजला
नेहमीच फसवून गेला ।

गर्दीत अनोळख्यांच्या
मज मैत्र एक भेटला ।
जीवलगच तो जीवाचा
मग घाव घालून गेला ।

लाविले कसास माझ्या
मी प्रत्येक श्वासाला ।
क्षणाक्षणांनी काळही
मजला परखून गेला ।

शोधियले त्रिखंडात मी
त्याच सर्वेश्वराला ।
-हुदयीचा गाभारा पण
रिताच राहून गेला ।

कवयित्री: मनीषा
रूपक तालात गायलेली चाल इथे ऐका.

२ टिप्पण्या:

आदिती म्हणाले...

खूप सुंदर चाल आहे काका! 'हाय' या शब्दामधील भावना तुम्हाला अचूक पकडता आली आहे.

आदिती म्हणाले...

तुमच्या ब्लॉगवरचे प्लेयर्स कृपया तपासून पाहा. काही काही गाणी खूप जलद धावत आहे.