सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

रविवार, ५ एप्रिल, २००९

रंग मेंदीचा!

रंग मेंदीचा..ही अजून एक क्रान्तिची सुंदर अशी रचना आहे. त्यामुळे चाल लावताना फारसे कष्ट नाही पडले.

रंग मेंदीचा

रंग मेन्दीचा हातावरती अजून खुलतो कधी कधी
शारदरात्री तोल मनाचा अजून ढळतो कधी कधी

हिरमुसलेली रातराणी ही कधी अचानक मोहरते
निशिगंधाचा धुंद ताटवा अजून फुलतो कधी कधी

खिन्न मनाच्या मैफलीत या आर्त विराणी गाताना
आनंदाचा सूर अचानक अजून जुळतो कधी कधी

वठलेल्या निष्पर्ण मनाच्या थरथरत्या फांदीवरती
आशेचा हलका हिंदोळा अजून झुलतो कधी कधी

कधी अचानक हसता हसता डोळे भरती अन झरती
फुले वेचता चुकार काटा अजून सलतो कधी कधी

तृप्त मनाच्या नभी अचानक दाटून येई मळभ कसे?
अवचित हळ्वा भास तुझा का अजून छळतो कधी कधी?

कवयित्री: क्रान्ति

चाल ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: