सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!


*इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

शुक्रवार, २४ मार्च, २०१७

माझी कविता ’चाल’वण्याची वाटचाल!

मंडळी नमस्कार!
काल सहजच लक्षात आलं की गंमत म्हणून सुरु केलेला हा उपद्‌व्याप कुठल्या कुठे पोचलाय...ह्या निमित्ताने शेकडो कवी/कवयित्रींच्या विविध प्रकारच्या काव्यरचना आपण  नकळतपणे ’चाल’वत गेलो आणि अजूनही त्यात कंटाळा आलेला नाहीये.

आपण कवितांना सहज  ’चाल’वू शकतो असं नेहमीच वाटायचं आणि समोर येणार्‍या कविता वाचता वाचता त्या मी मनात गुणगुणतही असे....अर्थात हे  सगळं  मी कधी फारसं गांभीर्याने नव्हतं घेतलेलं....ध्वनीमुद्रित वगैरे करून कुणाला ऐकवणं वगैरे खूपच दूरची गोष्ट.....पण...

काही वर्षांपूर्वी एकदा माझी ओळख विवेक काजरेकर ह्या संगीत दिग्दर्शकाशी झाली...पुलं आणि संगीत हे आम्हा दोघांचे खास जिव्हाळ्याचे विषय....संगीतातलं शास्त्र मला कळत नव्हतं आणि आजही ते कळतंय असं म्हणण्याचं धारिष्ट्य नाहीये...पण पुलंच्या ’रावसाहेब’ ह्या पात्राप्रमाणे मला एखाद्या रागाचा सुटलेला/सुटणारा काष्टा  किंवा रागिणीचा ढळळेला/ढळणारा पदर चटकन कळतो/लक्षात येतो....वर्षानुवर्षे दिग्गजांचं गाणं ऐकत आलोय त्याचाच हा परिणाम असावा...तर सांगायचा मुद्दा हा की काजरेकरांनी मला खर्‍या अर्थाने ’चाल’क बनवलं....कसं? त्याची कहाणी मी माझ्या पहिल्याच जाहीर चालीच्या निमित्ताने लिहिलेली आहे...ती वाचा...सवड काढून.  

एकदा तिथून सुरुवात झाली आणि मग मी सुसाट  सुटलो...दिसली कविता , लावली चाल की मग ती ध्वनीमुद्रित करून लोकांपुढे ठेवायची....ऐका/ नका ऐकू...तुमची मर्जी..ह्या न्यायानं.  

ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, नामदेव महाराज, चोखोबा , एकनाथ वगैरे संत, स्वातंत्र्यवीर सावरकर, शब्दप्रभू गदिमा, इंदिरा संत,लोककवी मनमोहन नातू, ग्रेस इत्यादि मराठीतील नामवंत कवी/गीतकार , हिंदी उर्दूतील निदा फाजली,गुलजार ह्यांच्यासारखे नामवंत कवी/गीतकार , गुजरातीमधील नामवंत कवी हरिंद्र दवे ह्यांच्यासहित महाजालावरील विद्यमान नामवंत  प्रसाद शिरगांवकर, क्रांति साडेकर, जयश्री अंबासकर, भारती बिर्जे डिग्गीकर, सुप्रिया जाधव, कामिनी  केंभावी, विजयकुमार देशपांडे, उमेश कोठीकर, गंगाधर मुटे, अरूण सांगोळे, एकनाथ आव्हाड, मिलिंद फणसे, शैलेश हिंदळेकर, आबा महाजन, रविंद्र जवादे, उत्तम सदाकाळ, कवी  सुजन इत्यादिंसह  अजून अनेक लहानथोर मराठी/हिंदी/गुजराती कवी/कवयित्री....माझ्या कचाट्यातून सुटलेले नाहीत.  

मी हे जे काही केलं ह्यामुळे समोरच्यांना किती आनंद मिळाला हे मला माहीत नाही....पण मला मात्र प्रचंड आनंद मिळाला आणि म्हणूनच तुम्हा सर्व कवीमंडळींचा मी शतश: ऋणी आहे....माझा एकटेपणा मला कधी जाणवलाच नाही...तुमच्या कवितांच्या संगतीत....तुमच्या कविता आहेत म्हणूनच माझी ’चाल’ आहे.....ती ’चाल’ सुडौल/बेडौल कशीही असेल पण तरी ’चाल’त राहणे ही माझी सहजप्रवृत्ती आहे आणि जोवर तुमच्या कविता रचणे संपत नाही तोवर माझी ’चाल’ही चालूच राहणार आहे....

धन्यवाद!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: