सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!


*इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

गुरुवार, ५ मार्च, २०१५

पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी


पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी
सोडणार ना रंगविल्याविण नटखट ग गिरीधारी ..

'नको' 'नको' तू म्हणुन सारशिल, दूर दूर ग त्याला
'हो' 'हो' म्हणतच, पुढे पुढे तो धरील पिचकारीला
खट्याळ किती तो तुजला ठाऊक आहे ना गिरीधारी
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी ..

रंगबिरंगी इंद्रधनूतील सप्तरंग आणील
रंगवून तुज सर्वांगाला खुषीत तो येईल
काही न घडल्यासम.. पावा तो वाजवील गिरीधारी
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी ..

एकटीच तू दिसता येथे, गोपिकाही जमतील
मोहित करील बासरीवाला, सर्व फेर धरतील
समोर असुनी, नसेल कोठे, अद्वैतच गिरीधारी
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी ..


कवी: विजयकुमार देशपांडे