सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०१०

पालीच्या गणपतीची आरती!

पाषाणभेदने रचलेली ही पालीच्या बल्लाळेश्वराची आरती त्याच्या विनंतीवरून मी गायलेली आहे....पारंपारिक चाल असल्यामुळे माझे असे ह्यात काहीही योगदान नाहीये.

जयदेव जयदेव जय पालीश्वरा हो, देवा बल्लाळा
आरती ओवाळीतो  तुजला बल्लाळा
जयदेव जयदेव || ध्रु ||

देऊळ मोठे तुझे चौसोपी दगडी
असे आत मुर्ती शेंदरी उघडी
समोर घंटा भव्य खांब लाकडी
वर्णावया  रुप, बुद्धी तोकडी || १ ||


देवा तुझा निवास 'पाली’च्या गावी
तुझ्या दर्शनाने  दृष्टी सुखावी
मोदकांचा नैवेद्य मी तुजला दावी
कृपा भक्तांवर नियमीत असावी || २ ||


पौराणीक, ऐतिहासीक तव ग्राम असे
मंदिर सुंदर मागे सरसगड वसे
वर्णन म्या पामर करू तव कैसे
सच्चा एक मुढ वंदन करीतसे || ३ ||


कवी: पाषाणभेद(दगडफोड्या)

आरती इथे ऐका

1 टिप्पणी:

pashanbhed म्हणाले...

काकांचा काम करण्याचा झपाटा फार आहे. आजच सकाळी मी मागणी केली अन आता लगेच आरती तयार !
छान काम झालेय.
धन्यवाद.