मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०१०

शाश्वत

क्रान्तिची, तिचं शब्दप्रभुत्त्व दाखवणारी, ही अजून एक सुंदर अशी काव्यरचना. माझ्या चालीतून तिने कवितेत व्यक्त केलेल्या भावना व्यक्त होताहेत का ते सांगा जरा.

खळाळते जलतरंग सुंदर
स्वरलहरींचे मोती उधळत
कणाकणातुन छेडित येती
स्वर्गीचे संगीत अनाहत

दुग्धधवल धारांचे नर्तन,
हिरवे-काळे कातळ उजळत
रुद्रजटेतिल गंगेसम ते
भव्य-दिव्य सौंदर्य अनवरत

हिमकण जैसे तुषार झेलुन
पर्णपाचुचे किरण चकाकत
इंद्रधनूची रंगसंगती
लेवुन वृक्षलताहि सुशोभित

अमोघ अस्त्रापरी कोसळे
तो घनघोर प्रपात अखंडित,
स्तंभित अन नि:शब्द उभी मी,
अशाश्वतातिल शाश्वत शोधत!

कवयित्री: क्रान्ति साडेकर

चाल इथे ऐका.

२ टिप्पण्या:

सुरेश पेठे म्हणाले...

चाल मस्त झालीय. मला एक असं वाटतंय आपण प्रत्येक कडव्या नंतर
खळाळते जलतरंग सुंदर
ही ओळ म्हणता. त्या आधीची ओळ " त " ने संपते व नंत्तर येणारी ओळ "र " ने संपताना यमक न जुळल्याने थोडे वेगळे वाटते.
एक सुचना कराविशी वाटते की.
कडवे संपले की दुसरी ओळ,
स्वरलहरींचे मोती उधळत
ही म्हणून मग पहीली म्हटली तर?

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद पेठेसाहेब.
आपल्या सुचनेप्रमाणे करून पाहतो.