शनिवार, ४ एप्रिल, २००९

हुरहुर!

अरूण मनोहर हे देखिल महाजालावरचे लेखक/कवींमधले एक परिचित नाव. मनोगत,मिसळपाव सारख्या नामांकित संकेतस्थळावर ते नियमितपणे लेखन करत असतात. त्यांच्या "हुरहुर" ह्या कवितेला चाल लावताना नेहमीप्रमाणेच मी काही कडवी गाळलेली आहेत.

हुरहुर

स्वप्नातली फुले ती, सत्यात कां न दिसली?
मज जाग जरा येता, ती रात कां हरवली?

रात्रीत प्यायले होते, मी अश्रु यक्षीणीचे
विरही व्यथेत ओले, मृदुगंध पापणीचे
येता रवी उदयास, ती आसवेही सुकली
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?

होता मनात माझ्या, कोपरा उजळला एक
कवडसे नृत्य करीत, लयबद्धसे सुरेख
ती उजळताच प्राची, सावली अंतरी धरली
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?

मज सूर गवसला जो, कोठे हवेत विरला?
ती साद ऐकू ये ना, स्वप्नील भाव सरला
जाणीव करूनी सुन्न, जाणीव कां परतली?
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?

पाहीले रुप सुंदर, तव नयनी मी बुडालो
मी गमविले स्वतःला, माझाच मी न उरलो
अस्तीत्व कां मिळाले? कां झोप ती उघडली?
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?

स्वप्नामधील सत्य, गवसेल कधी कोणां?
कधी बंद होई वेडा, जागेपणाचा बहाणा?
झोपेत जगूनी नंतर, ती धुंदी कां उडाली?
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?

कवी: अरूण मनोहर

ह्या गीताची चाल खालील विजेटवर ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: