सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

रविवार, ५ एप्रिल, २००९

सुवर्णप्रभा!

सुवर्णप्रभा ही प्राजुची कविता वाचली आणि लक्षात आले की ह्या कवितेला केवळ एकच नाही तर त्याहुनही जास्ती चाली लागू शकतात.मग करू या काय प्रयोग? प्रयोगांती तीन वेगवेगळ्या चाली तयार झाल्या.

सुवर्णप्रभा

लाल केशरात रंग खेळते पहाट खास
दिव्य तेज फाकताच जागली दिशांत आस...

तारकांत लोपली निशा उषेस पाठवून
अग्निरंग होत धुंद पूर्व रेखिते नभांस...

सूर्य बिंब लाल बुंद भेदते तमास पूर्ण
विश्वतीर पेटताच जाहला सुवर्ण भास...

वाहताच वात मंद , मंद मंद गंध धुंद
सांडताच पारिजात भूवरी पडेल रास...

थेंब थेंब पाकळ्यांत आळसांत चिंब चिंब
का जपून पाकळीत ठेवलेय मोतियास? ...

सागरात गाज आणि लाट जात उंच उंच
गारवा हवेत आणि वेड लागते मनांस...

पंचमात तान घेत आज कोकिळा स्वरांत
मोहरून आम्रही सुगंधितो चराचरास...

दाटले धुक्यात रान, कोवळ्या उन्हांत पान
स्वप्न की प्रभात काल, प्रश्न हाच लोचनास...

कवयित्री: प्राजु

ऐका तर तीन वेगवेगळ्या चाली.
चाल क्रमांक-१

चाल क्रमांक-२

चाल क्रमांक-३