सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

गुरुवार, ३ जुलै, २०१४

आला पाऊस...काळ्यापांढऱ्या ढगी चमकते लखलख सौदामिनी
वर्दी देते वरुणाच्या जणु आगमनाची जनी..

पळापळी रस्त्यात जनांची देहभान विसरुनी
कशा अचानक वर्षाधारा धरतीवरती वरुनी ..

पहा पाखरे किलबिल करूनी विहरु लागली वनी
हंबरते कपिला गोठ्यातच आनंदुनिया मनी ..

श्वास दीर्घ छातीत घेति कुणि मृद्गंधा जाणुनी
खुषीत झुलती फुल-पाने किति तरुशाखेवरुनी ..

शीळ घालतो झोंबत वारा जोषातच येउनी
'आला पाऊस-' होई गर्जना बालमुखी नाचुनी..

धरणीमाता बोले बीजा काहीतरी कुजबुजुनी
हर्षित कोंबांची थरथर डोके धरतीवर काढुनी..

जो तो विस्मित, 'आला पाऊस' म्हणे खूप दिसांनी
'आता येतिल दिवस सुखाचे- दु:खाला पळवुनी' ..

कवी: विजयकुमार देशपांडे
.