सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०१०

''वाटतो जरी प्रसन्न मी वरुन''

डॉक्टर कैलास गायकवाड ह्यांची ही सुंदर गजल वाचून जी चाल सुचली ती आपल्यासमोर सादर करत आहे...सोईसाठी फक्त चारच द्विपदी घेतलेल्या आहेत.

वाटतो जरी प्रसन्न मी वरुन,
दु:ख साचलेय आत भरभरुन

झाकले उघड कसे करायचे?
ठेवले बरेच आज आवरुन

जिंकली असंख्य सौख्यसाधने
डाव जीवनात सारखे हरुन

धूम अश्व दौडतो मनातला
मी तसाच बांधतो पुन्हा धरुन

पोहणे न ज्ञात जाहले मला
जीवनात मी तरी असे तरुन

शुष्क भावना......... तरी तुझ्या सवे,
घाम का फुटे उगाच दरदरुन?

गंध काय आज जाणले जरी,
दु:ख जाहले फुलास कुस्करुन

काळ यायची अवेळ जाहली
वाट पाहतो स्वतःस सावरुन

कवी: डॉ.कैलास गायकवाड

चाल इथे ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: